सोलापूर जिल्हय़ासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणातील पाणीसाठा मंगळवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ९२.५१ टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, येत्या दोन-तीन दिवसांत धरण शंभर टक्के भरण्याची अपेक्षा आहे. पुणे जिल्हय़ातून येणा-या पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने धरण भरण्यास काहीसा विलंब लागत असल्याचे दिसून येते. दरम्यान, धरणात पाणीसाठा वाढल्याच्या पाश्र्वभूमीवर तीन दिवसांपूर्वी सुरू झालेला तेथील वीजनिर्मिती प्रकल्प मंगळवारी अचानकपणे बंद ठेवण्यात आला. त्यामागचे निश्चित कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
मंगळवारी सायंकाळी सहा वाजता उजनी धरणात पाण्याची पातळी ४९६.४८७ मीटर तर एकूण पाणीसाठा ३२०६.३६ दशलक्ष घनमीटर इतका होता, तर उपयुक्त पाण्याचा साठा १४०३.५५ दलघमी होता. धरणात पुणे जिल्हय़ातून येणारा पाण्याचा विसर्ग कमी झाला असून दौंड येथून येणारा पाण्याचा विसर्ग ८८२८ क्युसेक तर पुण्याच्या बंडगार्डन येथून येणा-या पाण्याचा विसर्ग ४८९४ क्युसेक इतका होता. धरणाच्या दोन्ही कालव्यांत सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग २३०० व बोगद्यातील पाण्याचा विसर्ग ६५० क्युसेक होता.
दरम्यान, शहर व जिल्हय़ात काल सोमवारी रात्री पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सोलापूर शहरासह उत्तर सोलापूर तालुक्यात ७.८८ मिलिमीटर पाऊस पडला, तर बार्शी, अक्कलकोट, मंगळवेढा, पंढरपूर, माढा, दक्षिण सोलापूर आदी भागांत पावसाचे शिडकावे पडले. जिल्हय़ात आतापर्यंत २५६.६९ मिमी पाऊस पडला आहे. या पावसाची टक्केवारी ५२.५१ इतकी आहे. गतवर्षी वरुणराजाने कृपादृष्टी दाखवली नव्हती. त्यामुळे गतवर्षी याच कालावधीत पडलेल्या पावसाचे प्रमाण अत्यल्प म्हणजे १५८.९४ मिमीइतकेच होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा