बहुप्रतिक्षित उजनी योजनेचे काम आता जवळपास पूर्ण झाले आहे. उजनी जलाशयातून उस्मानाबादच्या दिशेने निघालेल्या पाण्याने १०० किलोमीटरचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला. उद्या (मंगळवारी) दिवसभरात के व्हाही पाणी शहरात दाखल होणार असल्याची माहिती माजी राज्यमंत्री आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली.
पालिकेतील अध्यक्षांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. सोमवारी दुपारी ४ वाजता उजनीचे पाणी उस्मानाबाद जिल्ह्य़ाच्या हद्दीत दाखल झाले. खांडवी ते कौडगाव अंतरात एकाही ठिकाणी लिकेज नव्हते. त्यामुळे खांडवी ते कौडगाव दरम्यान कोणतीही समस्या न येता पाणी जिल्ह्य़ाच्या हद्दीत दाखल झाले. शहरात पाणी येण्यास आता केवळ १२ किलोमीटरचे अंतर शिल्लक राहिले आहे. त्यातील ८ किलोमीटरचे अंतर मोठय़ा चढाचे आहे. सुमारे १२५ मीटर इंच चढ असल्यामुळे कोणती अडचण न आल्यास मंगळवारी दिवसभरात पाणी शहरात पोचणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. कौडगाव येथे पाणी आल्यानंतर जागृत देवस्थान असलेल्या मारुती मंदिरात पाण्याने अभिषेक करून पाण्याचे पूजन केल्याचे त्यांनी सांगितले.
पाणी शहरात दाखल झाल्यानंतर तेरणा जलशुद्धीकरणात सर्व धर्मगुरूंच्या हस्ते जलपूजन करण्यात येणार आहे.
उस्मानाबादक रांच्या दृष्टीने हा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. शहर व परिसराचा कायापालट या योजनेमुळे होणार आहे. त्यामुळे निश्चितच हा जण आनंदोत्सव साजरा करण्याजोगा आहे. जलपूजनानंतर शहरातून जलदिंडी काढून विविध धार्मिक स्थळांमध्ये उजनीच्या पाण्याने पूजन केले जाईल. शहरवासियांनी मोठय़ा आनंदाने जलदिंडीत सहभागी व्हावे, असेही पाटील यांनी सांगितले. १२ किंवा १७ मार्चला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत या योजनेचे लोकार्पण केले जाणार आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग सुकर
शासकीय रुग्णालयास नवीन इमारत बांधण्यास ३५ कोटी निधी मंजूर झाला. त्यातून २५० खाटा क्षमतेची इमारत उभारण्यात येणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीचा दावा करण्यासाठी ५०० खाटांचे रुग्णालय आणि २० एकर जागेची आवश्यकता असते, त्यातील एक अट आपण पूर्ण केली. सध्या जिल्हा रुग्णालयाकडे १६ एकर जागा आहे. त्याला लागूनच जिल्हा परिषद कन्या प्रशालेची ५ एकर जागा आहे. जिल्हा परिषदेने ती जागा रुग्णालयाकडे वर्ग केल्यास वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग सुकर होऊ शकेल. त्या अनुषंगाने जि. प. सर्वसाधारण सभेत तशी मागणी करण्यात आली. काहीजणांनी त्याला आक्षेप घेतल्यामुळे ठराव होऊ शकला नाही. पुढील सभेत त्याबाबत निश्चित ठराव होईल, असेही पाटील यांनी सांगितले.
तुळजापूर ग्रामीण भागालाही मिळणार पाणी
उजनी जलाशयातून शहराला दररोज ८० लाख लिटर पाणी मिळणार आहे. शहरातील टाक्यांमध्ये १३५ लाख लिटर पाणी साठवण क्षमता आहे. शहरात येणाऱ्या पाण्यापैकी १० लाख लिटर पाणी तुळजापूर शहराला, २० लाख लिटर पाणी गरजेनुसार परिसरातील ग्रामीण भागाला पुरविले जाणार आहे. उर्वरित ५० लाख लिटर पाणी शहरवासियांना सध्या उपलब्ध असलेल्या जलवाहिनीतूनच दिले जाणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
उजनीचे पाणी उस्मानाबादेत दाखल!
बहुप्रतिक्षित उजनी योजनेचे काम आता जवळपास पूर्ण झाले आहे. उजनी जलाशयातून उस्मानाबादच्या दिशेने निघालेल्या पाण्याने १०० किलोमीटरचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला.
First published on: 05-03-2013 at 02:26 IST
TOPICSउस्मानाबाद
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ujni water reached in usmanabad