उजनी धरणातून शहराला दररोज ८० लाख लीटर पाणी मिळणार आहे. शहराची सध्याची गरज ४० लाख लीटरची आहे. उर्वरित पाणी गरजेनुसार तुळजापूर शहर व ग्रामीण भागातही दिले जाईल. मात्र, पाण्यासाठी मीटरचा वापर केला जाणार असल्याने जेवढे पाणी वापराल, त्या तुलनेत पाणीपट्टी अदा करावी लागणार असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली.
शहरातील टंचाई निवारणासाठी सुरू असलेल्या कामाची माहिती देण्यासाठी नगरपालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपनगराध्यक्ष अमित शिंदे, मुख्याधिकारी चारठाणकर उपस्थित होते. पाणीपुरवठय़ासाठी पालिका प्रयत्न करीत असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. काही भागात ४० दिवसांनी, तर काही भागात १५ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरात वेगवेगळे भाग तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार त्या त्या भागाचे वेळापत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे. पालिकेकडून अधिकृतरीत्या ते जाहीर केले जाईल. त्यामुळे नागरिकांना आपल्या भागात कोणत्याही दिवशी, केव्हा पाणी येणार याची शाश्वत माहिती मिळेल, असेही त्यांनी सांगितले. उजनी धरणातून पाणीपुरवठा सुरू होण्यापूर्वी सध्या शहरात नेमक्या काय उणिवा राहिल्या आहेत, हे शोधण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सात अभियंते मागवून घेतले आहेत. हे अभियंते शहरातील पाणी व त्याच्या वापराचे लेखापरीक्षण करतील. त्याचबरोबर शहरात सुस्थितीत असलेल्या विंधन विहिरींचा अहवालही सादर करतील. ज्या विंधन विहिरी पालिकेकडून अधिग्रहित केल्या जातील, त्यावर स्वतंत्र सबमीटर बसविले जाईल. त्याचे वीजबिल सरकारमार्फत अदा केले जाईल. सरकारने ते न दिल्यास पालिका स्वत: जबाबदारी घेऊन ही रक्कम अदा करील, असेही त्यांनी नमूद केले.
अडीच किलोमीटरचे काम अपूर्ण
उस्मानाबाद शहराला ११४ किलोमीटर अंतरावरील उजनी धरणातून पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यातील २ हजार ५५० मीटर अंतराची जलवाहिनी अंथरण्याचे काम अद्याप बाकी आहे. टेंभुर्णी व रिधोरे या दोन ठिकाणी हे काम शिल्लक आहे. शासनाने २५ कोटी रुपये उपलब्ध करून दिल्यामुळे या कामाला वेग आला असल्याचे पाटील यांनी सांगितले.
शहरातील मुख्य जलवाहिनीवर एकूण २२ नळजोड असून त्याद्वारे २४ तास पाणीपुरवठा सुरू आहे. विशेषत: या पाण्याचा मंगल कार्यालय, हॉटेल आणि बांधकामासाठी सर्रास वापर सुरू आहे. नळजोडणीधारकांमध्ये काही पालिकेचे पदाधिकारी असल्याचेही निदर्शनास आले आहे. याबाबत विचारणा केली असता, मुख्य जलवाहिनीवर असलेली नळजोडणी तोडण्याच्या सूचना आमदार पाटील यांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिल्या.
‘निधी उपलब्धतेमुळे उजनी योजनेला गती’
उजनी धरणातून शहराला दररोज ८० लाख लीटर पाणी मिळणार आहे. शहराची सध्याची गरज ४० लाख लीटरची आहे. उर्वरित पाणी गरजेनुसार तुळजापूर शहर व ग्रामीण भागातही दिले जाईल. मात्र, पाण्यासाठी मीटरचा वापर केला जाणार असल्याने जेवढे पाणी वापराल, त्या तुलनेत पाणीपट्टी अदा करावी लागणार असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली.
First published on: 10-01-2013 at 01:52 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ujni yojna moves fast as gets the fund