कोकणातल्या एका गावातून काही तरुण ‘जगण्यासाठी’ मुंबईत येतात. नोकरी मिळवताना, राहण्यासाठी जागा शोधताना आणि मुंबईच्या वेगाशी जमवून घेताना त्यांची चांगलीच त्रेधातिरपीट उडते. मात्र यातून शिकत हे तरुण एकत्र येत एक संस्था स्थापन करतात आणि आपल्या मागून मुंबईत येणाऱ्या ‘गाववाल्यां’ना तो त्रास सहन करावा लागू नये, यासाठी झगडतात. हे करता करता सामाजिक भान न विसरता ते समाजातील उपेक्षित घटकांना मदतही करतात. ही कहाणी आहे वेंगुल्र्यातून मुंबईत आलेल्या काही तरुणांची आणि त्यांनी स्थापन केलेल्या ‘उमेद कोकण संघटने’ची! या संघटनेच्या माध्यमातून या सर्व तरुणांनी यंदाची धुळवड मुरबाडजवळच्या मामणोली गावातील एका संस्थेत राहणाऱ्या घरातून पळून आलेल्या, वाट चुकलेल्या, रेल्वे प्लॅटफॉर्म अथवा फुटपाथवर राहणाऱ्या मुलांबरोबर साजरी केली.
वेंगुल्र्याच्या एकाच महाविद्यालयात शिकणारे काही तरुण-तरुणी नोकरी शोधायला मुंबईत आले. मात्र त्यांना मुंबईत स्थिरस्थावर होण्यासाठी खूपच खस्ता खाव्या लागल्या. तरीही आपली सामाजिक जाणीव न विसरत त्यांनी एकत्र येत उमेद कोकण संघटना स्थापन केली. या संघटनेच्या माध्यमातून अनाथाश्रमातील मुलांना गरज असलेल्या वस्तू पुरवणे, वृद्धाश्रमातील नागरिकांना लागणारी औषधे पुरवणे,
गावाहून येणाऱ्या नव्या तरुणांना मुंबईत मार्गदर्शन करणे, अशा अनेक गोष्टी केल्या जातात.
या तरुणांनी यंदा एकत्र येत धुळवड अनोख्या पद्धतीने साजरी करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी थेट मुरबाडजवळील मामणोली हे गाव गाठले. मुंबईच्या रस्त्यांवर गुन्हेगारीमध्ये अडकलेल्या मुलांना प्रेमाने समजावून त्यांना चांगल्या मार्गाकडे वळवण्याचे काम करणाऱ्या ‘समतोल फाऊंडेशन’ या संस्थेमध्ये त्यांनी यंदा धुळवड साजरी केली. या धुळवडीच्या निमित्ताने त्यांनी या मुलांच्या आयुष्यात खरेखुरे रंग, पुरणपोळी आणि ब्लँकेट्सही वाटली. या मुलांबरोबर रंग, संगीतखुर्ची असे खेळ खेळत त्यांनी एक दिवस या मुलांबरोबर काढला.

Story img Loader