अनधिकृत बांधकामप्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेले आंदोलन ‘वरातीमागून घोडे’ नाचवण्याचा व पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रकार असून यासंदर्भात आपल्याला विश्वासात न घेता हे आंदोलन झाले असल्याने ते काँग्रेसचे नव्हतेच, अशी प्रतिक्रिया शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनीच पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांवर अविश्वास दाखवण्याचा हा प्रकार असून ते अकार्यक्षम ठरतील, असे वातावरण आपणच तयार करत आहोत. कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांचा अपमान झाल्याची टिप्पणी भोईर यांनी केली.
शहर काँग्रेसमधील भोईर विरोधकांनी अनधिकृत बांधकामप्रकरणी गुरूवारी िपपरीत धरणे आंदोलन केले. भोईर, विरोधी पक्षनेते कैलास कदम व पक्षाचे सुमारे १० नगरसेवक या आंदोलनात सहभागी झाले नव्हते. मात्र, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. यानिमित्ताने भोईरांवर कुरघोडी करण्याची खेळी यानिमित्ताने केल्याचे बोलले जाते. यासंदर्भात भोईरांनी स्वत:ची बाजू मांडली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे नगरविकास खाते आहे. अनधिकृत बांधकामांचा विषय अंतिम निर्णयाच्या टप्प्यात व न्यायालयीन प्रक्रियेत आहे. यावर जाहीर भाष्य करणे किंवा रस्त्यावर येऊन आंदोलन करणे चुकीचे आहे. यासंदर्भातील निर्णय कुठल्याही एका शहरासाठी घेता येत नसून ते धोरण संपूर्ण राज्यासाठी ठरणार आहे. त्यामुळे त्यावर सर्व बाजूने विचार सुरू असल्याने मुख्यमंत्र्यांना दोषी धरता येणार नाही. मात्र शहराध्यक्षाशी चर्चा न करता एखादा साक्षात्कार झाल्यासारखे आंदोलन करण्यात आले. एवढे दिवस काय करत होतात, या प्रश्नाला उत्तर नाही. राष्ट्रवादीशी आपला घरोबा आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. केवळ विरोधासाठी विरोध न करता योग्य ठिकाणी संघर्ष करण्याची आपली भूमिका आहे. राष्ट्रवादीच्या विरोधात सभागृहात विरोधी मतदान केल्याचे उदाहरण देत यापुढेही आवश्यक तेथे राष्ट्रवादीशी संघर्ष करण्याचे सूतोवाच भोईर यांनी केले.      
  ‘हर्षवर्धन पाटील यांना खुजेपणा आणू नका’
धरणे आंदोलनासाठी हर्षवर्धन पाटील यांचे आदेश नव्हते. ते ठराविक गटाचे नसून सर्वाचे नेते आहेत. त्यांना खुजेपणा आणण्याचे काम काही जण करत असतात. आंदोलनात सहभागी झालेले ‘ते’ कार्यकर्ते महान आहेत. सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक असून आपण त्यांच्यासमोर खूप छोटे आहोत, अशी सूचक टिप्पणी भाऊसाहेब भोईर यांनी केली.

Story img Loader