कल्याण-डोंबिवली पालिकेच्या गेल्या दोन माजी आयुक्तांनी आपल्या स्वार्थासाठी प्रशासनाची घडी विस्कटून टाकल्याने दोन्ही शहरांमध्ये कधी नव्हे एवढी अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. या अनधिकृत बांधकामांमधून घाम न गाळता मिळणारा ‘सहज पैसा’ (इझी मनी) पालिकेतील वरिष्ठ अधिकारी ते सर्वोच्च पदाधिकाऱ्यांपासून थेट काही पत्रकारांपर्यंत ‘झिरपत’ असल्याने लाचखोर गणेश बोराडे याच्यासारखा अधिकारी अनेकांच्या गळ्यातील ‘ताईत’ बनला होता.
या अनधिकृत बांधकामांच्या ‘कुरणांतून’ अधिक ‘चारा’ उपलब्ध व्हावा म्हणून पालिकेच्या सातही प्रभाग क्षेत्रांमध्ये निवृत्तीच्या उंबरठय़ावर असलेले, काही पात्रता नसलेले आणि यापूर्वी निलंबित असलेले प्रभाग क्षेत्र अधिकारी सर्वोच्च पालिका पदाधिकाऱ्यांच्या ‘आशीर्वादा’ने व प्रशासनाच्या ‘वरदहस्ता’मुळे कार्यरत आहेत. गेल्या तीस ते चाळीस वर्षांत पालिका हद्दीत ७७ हजार अनधिकृत बांधकामे उभी राहिली. गेल्या सात वर्षांत पालिका हद्दीत २७ हजारांहून नवीन अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. माजी आयुक्त गोविंद राठोड, रामनाथ सोनवणे यांच्या कार्यकाळात या बांधकामांनी सर्वाधिक जोर धरला. विद्यमान आयुक्त शंकर भिसे यांच्या कार्यकाळात तर ‘१२ (तास) बाय ७ (आठवडा)’ या सूत्राने बेसुमार अनधिकृत बांधकामे उभारली जात आहेत. शहरातील मोकळी मैदाने, आरक्षणे, टिटवाळा, बल्याणी, नेतिवली, गांधारे, बारावे येथील टेकडय़ा, डोंबिवलीतील आयरेगाव, कोपर पूर्व, पश्चिमेतील खाडी किनारा भूमाफियांनी पालिका अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवकांच्या आशीर्वादाने गिळंकृत करण्यास सुरुवात केली आहे. या बांधकामांमधून प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना भूमाफियांकडून ‘सहज पैसा’ उपलब्ध होतो. ‘लक्ष्मी’च्या पावलाने समाधान झालेले काही नगरसेवक ही ‘लक्ष्मी’ आपण विकासपुरुष आहोत अशा आविर्भावात प्रभागातील महिलांचे हळदीकुंकू कार्यक्रम, ज्येष्ठ नागरिक मेळावा, सत्यनारायण पूजा, स्नेह संमेलनांना ‘दान’ म्हणून देतात. असा हा ‘सहज पैसा’ भूमाफिया अनधिकृत बांधकामांमधून पालिका अधिकाऱ्यांमार्फत नगरसेवकांकडून सामाजिक कार्यासाठी वापरून ‘पांढरा’ करण्याचा प्रयत्न करतात. काही अधिकाऱ्यांचे भव्य फ्लॅट, बंगले, फार्म हाउस या इझी मनीचे रूप दाखवतात. या ‘इझी मनी’च्या वापराकडे प्राप्तिकर विभागाचे दुर्लक्ष असल्याने हा काळा पैसा पांढरा करण्यात धनदांडगे यशस्वी होऊन आपली बांधकामांची खेळी यशस्वी करीत आहेत, असे एका जाणकाराने सांगितले. गेल्या १८ वर्षांत १८ भ्रष्टाधीश कल्याण डोंबिवली पालिकेत लाच घेताना सापडले. या कालावधीत एकाही नगरसेवकाची कधी प्राप्तिकर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उघडपणे चौकशी करून त्यास दोषी ठरविले नाही. पालिका अधिकाऱ्यांकडून मालमत्तेचे विवरण दरवर्षी भरून घेतले जाते. असे विवरण यापूर्वी स्लिपर, सायकलवर फिरणाऱ्या, फाटके कपडे घालणाऱ्या पण पालिकेत नगरसेवक म्हणून दाखल झाल्यानंतर ‘उंची’ गाडय़ांमधून फिरणाऱ्या नगरसेवकांकडून का भरून घेतले जात नाही, असाही प्रश्न बोराडेच्या अटकेच्या निमित्ताने पुढे आला आहे.
प्रभाग अधिकाऱ्यांची गुपचिळी
पालिकेत प्रभाग क्षेत्र अधिकारी म्हणून पात्र असलेले विनय कुळकर्णी, प्रकाश ढोले, अनिल लाड, सुभाष भुजबळ, सुनील भावसार, शांतिलाल राठोड असे दहा अधिकारी विविध विभागांत सही आणि शिक्के मारण्याची कामे करीत आहेत. विद्यमान प्रभाग अधिकाऱ्यांमधील रवींद्र गायकवाड, चंदूलाल पारचे, लहू वाघमारे, परशुराम कुमावत हे अनधिकृत बांधकामे रोखण्यात अपयशी ठरल्याची टीका नगरसेवकांनी वेळोवेळी महासभेत केली आहे. यामधील काही अधिकाऱ्यांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी झाल्या आहेत.
कल्याण डोंबिवली पालिकेतील भ्रष्टाधीशांच्या मुळाशी अनधिकृत बांधकामांची ‘कुरणे’
कल्याण-डोंबिवली पालिकेच्या गेल्या दोन माजी आयुक्तांनी आपल्या स्वार्थासाठी प्रशासनाची घडी विस्कटून टाकल्याने दोन्ही शहरांमध्ये कधी नव्हे एवढी अनधिकृत बांधकामे सुरू आहेत.
First published on: 04-02-2014 at 06:13 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unauthorised buildings at kalyan dombivali