डोंबिवलीजवळील कचोरे गावाच्या हद्दीत वाहनतळ तसेच अन्य उपयोगासाठी पालिकेच्या ५०० चौरस मीटरच्या एका भूखंडावर गेल्या काही महिन्यापासून या भागातील एक राजकीय पुढारी दहशतीच्या बळावर अनधिकृतपणे चाळी उभारत असल्याच्या तक्रारी टिळकनगर पोलिसांकडे जागरूक नागरिकांकडून करण्यात आल्या आहेत.
गेले तीस ते चाळीस वर्षांपूर्वी एका सद्गृहस्थाने हा भूखंड आरक्षित झाल्याने शासनाकडे हस्तांतरित केला होता. या भूखंडाचा नकाशा, त्यावरील आरक्षणाची माहिती त्यांनी टिळकनगर पोलिसांना नेऊन दिली. हा भूखंड आपल्या मालकीचा होता. तो वाहतूक विभागाच्या सुविधेसाठी शासनाने आपल्याकडून घेतला आहे. आता त्या भूखंडावर अनधिकृत चाळी उभारण्याचे काम सुरू आहे, असे भूखंडाच्या मूळ मालकाने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेऊन तात्काळ ‘डह्ण प्रभागाचे प्रभाग अधिकारी परशुराम कुमावत यांना पत्र लिहून या भूखंडावरील अनधिकृत चाळींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कुमावत यांनी अनधिकृत चाळी उभारणाऱ्या मालकाला नोटीस बजावली असल्याचे सांगितले. मात्र पालिका अधिकारी आणि भूमाफियांचे मधुर संबंध विचारात घेता या चाळींवर कारवाई होण्याची शक्यता कमी असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. अनधिकृत चाळी उभारणारी व्यक्ती ही एका राजकीय पुढाऱ्याची नातेवाईक असल्याचे कचोरे गावातील रहिवाशांनी सांगितले.
या भूखंडाची बाजारभावाप्रमाणे सुमारे पाच ते सहा कोटी रुपये किंमत आहे. या भूखंडावर दहा हजार चौरस फूट बांधकाम उभे राहू शकते. शहरात वाहनतळ, वाहतूक विभागासाठी स्वतंत्र जागांची गरज असताना उपलब्ध भूखंड भूमाफियांच्या घशात जात असताना पालिका, पोलीस आणि वाहतूक विभाग मूग गिळून का बसला आहे, असे प्रश्न जागरूक नागरिकांकडून करण्यात येत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा