आसारामबापू आश्रमाचे अतिक्रमण हटविल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आश्रमालगतच्या बहुतांश जागा मालकांनी आपापल्या ताब्यातील रस्त्यात जाणारी जागा महापालिकेकडे सुपुर्द करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे पहावयास मिळाले. पाठोपाठ पालिकेने युद्धपातळीवर रस्ता बनविण्याचे काम पोलीस बंदोबस्तात हाती घेतले. पोलिसांनी कठोर कारवाईची तंबी दिल्यामुळे आणि रस्त्याच्या मार्गातील इतर जागाही मोकळ्या झाल्यामुळे आश्रमातील साधकांचा विरोध पूर्णपणे मावळला.
गंगापूर रस्त्यावरील आसारामबापू आश्रमापासून आनंदवल्लीकडे जाणारा २४ मीटर लांबीच्या रस्त्याच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले होते. आश्रमातून जाणाऱ्या रस्त्याची जागा पालिकेच्या ताब्यात देण्याची तयारी दर्शविली गेली असली तरी जागा ताब्यात घेण्यास गेल्यावर विरोध केला जात होता. या पाश्र्वभूमीवर, अतिक्रमण विरोधी पथकाने पोलीस बंदोबस्तात गुरूवारी अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली.
यावेळी साधकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो न जुमानता अतिक्रमण उध्वस्त करण्यात आले. रात्री आठ वाजेपर्यंत हे काम झाल्यावर शुक्रवारी सकाळी पालिकेची यंत्रणा लगेच रस्त्या तयार करण्याच्या कामाला लागली. रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी आश्रमालगतच्या जागाही ताब्यात मिळणे आवश्यक होते. दोन दिवसांपूर्वी नगररचना विभागाने या रस्त्याच्या जागेवर खुणा केल्या होत्या. आश्रमालगत माजी महापौर प्रकाश मते यांचीही काही जागा आहे. तसेच काही बांधकाम व्यावसायिक आणि काही शेतकरी यांचीही जागा असून आश्रमातील अतिक्रमण हटल्यानंतर संबंधितांनी लगेच आपल्या ताब्यातील जागा रस्त्यासाठी पालिकेच्या स्वाधीन करण्यास सुरूवात केल्याची माहिती शहर अभियंता सुनील खुने यांनी दिली. काही जागा मालकांनी तर रस्ताही तयार करवून दिलेला आहे. आश्रम ते आनंदवल्लीलगतच्या गंगाजल रोपवाटिकेपर्यंतच्या रस्त्याची जागा लगेच मोकळी झाल्याचे दिसून आले.सकाळपासून पालिकेच्या मालमोटारी आश्रमातील जागेवर मुरूम टाकत होत्या.
आदल्या दिवशीप्रमाणे काही साधक जमा झाले होते. परंतु, पोलिसांनी कारवाईचा इशारा दिल्यावर त्यांनी फारसा विरोध केला नाही. आश्रमाप्रमाणे पुढील जागाही मोकळ्या होत असल्याने त्यांचा विरोध पूर्णपणे मावळला. या रस्त्यावरील दोन ते तीन जणांची जागा अद्याप पालिकेच्या ताब्यात आली नसल्याचे सांगितले जाते.
महापालिकेने आसाराम बापू आश्रमाच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यास जी तत्परता दाखविली, तोच निकष शहरातील इतर अतिक्रमणे हटवितानाही लागू करावा, अशी शहरवासीयांची भावना आहे. आजही अनेक भागात अशाच कारणांस्तव काही रस्ते मध्येच खुंटलेले आहेत.
कुठे रस्त्याची जागा ताब्यात नसताना पुलाच्या बांधकामावर उधळपट्टी करण्यात आली. असे रखडलेले रस्तेही तत्परतेने मार्गी लावावेत, अशी मागणी केली जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा