लक्ष्मी रस्त्यावर खरेदीसाठी येणाऱ्या लोकांच्या सोईसाठी ‘वॉकिंग प्लाझा’ उभारण्यात आला. तिथे पथाऱ्या तर आल्याच पण बेशिस्त पार्किंगलाही मोकळे रानच मिळाले. या भागातील वाहतूक व्यवस्थापनाचा प्रयत्न अयशस्वी ठरण्यासाठी पथाऱ्यांबरोबरच सर्रास नो- पार्किंगमध्ये वाहने लावून खरेदीचा आनंद लुटणारे पुणेकरही तितकेच जबाबदार आहेत.
लक्ष्मी रस्ता व आसपासच्या भागांची ऐन गर्दीच्या वेळी ‘टीम लोकसत्ता’ने बुधवारी पाहणी केली. त्यात दिसलेले हे चित्र-
कुंटे चौक ते बेलबाग चौक- वेळ- सायं ६.००
कुंटे चौकातील प्रचंड गर्दीमुळे सिग्नल बंद ठेवण्यात आले होते. नारायणपेठेकडून कजरी दुकानाकडे जाणारा रस्ता लहान आहे. तरीही तिथे एकामागोमाग एक दुचाकी लावलेल्या होत्या. कॉसमॉस बँकेच्या वळणावर लोक दुचाकी गाडय़ा लावून गाडीवर बसून होते. त्यांच्यासोबतची मंडळी खरेदीला गेली होती. असेच चित्र बहुतेक ठिकाणी दिसले. एके ठिकाणी तर आपल्या लहान मुलाला मोटारसायकलवर बसवून वडील खरेदी करण्यात दंग होते. काही ठिकाणी चारचाकी गाडय़ाही नो- पार्किंगमध्ये उभ्या होत्या. वाहतूक पोलीस आलेच तर मोटार तातडीने हलविण्यासाठी चालक मात्र मोटारीतच बसून होते. विश्रामबाग वाडा चौकाजवळ तर चक्क फुटपाथवर दुचाकी उभ्या केल्या होत्या.
गणपती चौक- वेळ- सायं ६:३०
गणपती चौकाच्या पुढे ‘पूना गेस्ट हाऊस’ खाली नो पार्किंगचा मोठा फलक आहे. पण, त्याकडे दुर्लक्ष करून तेथे बिनदिक्कत गाडय़ा उभ्या केल्या होत्या. या गाडय़ांमुळे रस्ता ओलांडून पदपथावर जाऊ पाहणाऱ्यांना अडथळा होत होता.
कुमठेकर रस्ता व लक्ष्मी रस्ता – वेळ ६.३०
लक्ष्मी रस्त्यावर ‘नो हॉल्टिंग, नो स्टॉिपग, नो स्टँडिग’ अशी पाटी लावली आहे. मात्र त्यास न जुमानता उभ्या केलेल्या चारचाकी गाडय़ांनी रस्ता व्यापला होता.
चालण्यास जागा मिळत नसल्याने पादचाऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात होता. शर्मिली चौकात रस्त्याच्या उजव्या बाजूला रुमाल विकणारे आजोबा शिट्टी घेऊन वाहतुकीचे नियमन करण्याचा प्रयत्न करत
होते.
कजरी दुकानाकडून शर्मिली दुकानाकडे येणाऱ्या रस्त्यावरची नो-पार्किंगची पाटी हातगाडी व त्यापुढे जमलेल्या गर्दीमुळे झाकली गेली होती. रस्त्यातच दुचाकी आणि चारचाकी वाहने थांबवून जिभेचे चोचले पुरवणाऱ्यांमुळे इतरांना पुढे जाणेही जिकिरीचे झाले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा