डोंबिवलीजवळील कोळे गावामध्ये अनेक विकासकांनी अनधिकृत बांधकामे सुरू केली आहेत. या नवीन बांधकामांना एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीवरून अनधिकृत नळजोडण्या घेतल्या जातात. त्यामुळे गावातील पाणीपुरवठय़ावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.
या जोडण्या घेणाऱ्या विकासकांवर कारवाई करावी, अशी मागणी येथील एक ग्रामस्थ नेताजी पाटील यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
गेल्या महिन्यात एमआयडीसीने या भागातील नऊ अनधिकृत नळजोडण्या तोडल्या. पण त्या विकासकांवर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे. याप्रकरणी ग्रामपंचायतीने व एमआयडीसीने संयुक्तपणे या भागातील नळ जोडण्यांची पाहणी करावी. ज्या विकासकांनी नवीन बांधकामांना अनधिकृत नळ जोडण्या घेतल्या आहेत त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी नेताजी पाटील यांनी केली आहे.
वारंवार पत्रव्यवहार करूनही अधिकारी पत्राची दखल घेत नाहीत, असे पाटील यांनी सांगितले.