शिवसेनेच्या स्थापनेनंतर अवघ्या वर्षभरात शिवसेनेला पहिली सत्ता मिळाली ती ठाणे नगरपालिकेत. तेव्हापासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ठाण्याशी अतूट नाते निर्माण झाले. शिवसेनेची स्थापना जून १९६६ मध्ये झाली तर ठाण्यात शिवसेनेची पहिली शाखा १ जानेवारी १९६७ मध्ये स्थापन झाली. १९६७ च्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला सत्ता मिळाली. वसंतराव मराठे हे पहिले नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. तेव्हापासून ठाणे आणि शिवसेना असे जणू काही समीकरणच तयार झाले. शिवसेनेच्या सुरुवातीला सर्व आंदोलनात ठाणे अग्रेसर असायचे. १९७४ मध्ये थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे सतीश प्रधान हे निवडून आले. ठाण्याच्या विकासात शिवसेनाप्रमुख स्वत: बारकाईने लक्ष घालत. ठाण्यात नाटय़गृह असावे अशी सूचना त्यांनी केली आणि त्यानुसार तलावपाळीवरील गडकरी रंगायतन हे नाटय़गृह उभारण्यात आले. ठाण्याचा पूर्ण कायापालट करावा, असा आदेश बाळासाहेबांनी दिला आणि त्याप्रमाणे सतीश प्रधान यांनी शहरातील सर्व रस्ते नव्याने तयार केले. ठाणे नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यावर झालेल्या पहिल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला सत्ता मिळाली. शिवसेनाप्रमुख राज्यभर सर्वत्र भाषणांमध्ये ठाणे शहराचा गौरवपूर्ण उल्लेख करीत. ज्या ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता मिळवून दिली, त्याच ठाण्यात शिवसेनेमध्ये फंदफितुरी झाली. महापौरपदाच्या निवडणुकीत झालेल्या दगाबाजीनंतर शिवसेनाप्रमुख कमालीचे संतप्त झाले व शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना राजीनामा देण्याचा आदेश दिला होता.
ठाण्यातील बारीकसारीक घटनांकडे त्यांचे लक्ष असायचे. ठाण्यात अनधिकृत टपऱ्या आणि बांधकामांचा सुळसुळाट झाला हे वृत्तपत्रांमधून छापून येऊ लागले तेव्हा त्याची बाळासाहेबांनी दखल घेतली होती. शिवसेनाप्रमुख स्वत: ठाण्याची पाहणी करायला आले आणि त्यांनी शहरात फेरफटका मारला. कल्याणमध्ये रस्तारुंदीकरणाची मोहीम धडाक्याने राबविणारे टी. चंद्रशेखर यांची ठाणे महानगरपालिका आयुक्तपदी नेमणूक करण्याचा आदेश तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना दिला होता. चंद्रशेखर यांनी ठाण्याचे रस्ते रुंद केले व शहराला आकार दिला असला तरी त्यांच्या मागे शिवसेनाप्रमुख खंबीरपणे उभे राहिल्याने ते शक्य झाले होते. आनंद दिघे व ठाण्यातील शिवसेनेच्या अन्य नेत्यांनी रस्ता रुंदीकरणाला विरोध दर्शविला होता, पण शिवसेनाप्रमुखांनी ठाण्याचा विकास झालाच पाहिजे, असे स्पष्टपणे बजाविले होते. टी. चंद्रशेखर यांच्याविरोधात ठाण्यातील नगरसेवकांनी अविश्वासाचा ठराव मंजूर करताच अवघ्या अर्धा तासात सरकारने तो फेटाळून लावला होता. हा ठराव फेटाळण्याचा आदेश शिवसेनाप्रमुखांनीच दिला होता. शिवसेनाप्रमुख प्रशासनाच्या मागे खंबीरपणे उभे राहिल्यानेच ठाण्याचा कायापालट शक्य झाला. शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादामुळेच ठाण्याचा विकास करणे शक्य झाले होते, अशी कबुली चंद्रशेखर यांनी दिली होती. १९८६, १९९२, १९९७, २००२, २००७ आणि २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये ठाण्याने शिवसेनेला साथ दिली. २००७ मध्ये महापालिका निवडणुकीपूर्वी ठाण्याच्या सेंट्रल मैदानात झालेल्या जाहीर सभेत शिवसेनाप्रमुखांनी ठाणेकरांना वाकून साष्टांग नमस्कार घातला होता. तेव्हा ठाणेकरांनी शिवसेनेला सत्ता दिली होती. या वर्षांच्या सुरुवातीला झालेल्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराकरिता तब्येत बरी नसतानाही शिवसेनाप्रमुख ठाण्यात आले होते. ठाण्याचा विकास मी केला हे सांगत त्यांनी ठाणेकरांना भावनिक आवाहन केले होते. शिवसेनेचे सर्वाधिक ५२ नगरसेवक ठाणेकरांनी निवडून दिले. ठाण्याबद्दल त्यांच्या मनात एक वेगळेच आकर्षण होते. ठाण्याने शिवसेनाप्रमुखांना नेहमीच भरभरून दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा