मध्य रेल्वे मंडळासह राष्ट्रीय रस्ते विकास प्रधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत मानकापूर, गोधनी व चिचोंडा या रखडलेल्या उड्डाण पुलांच्या विलंबाला रेल्वे जबाबदार नसल्याचे सांगून तातडीने काम करण्यासाठी दोन-तीन दिवसात मध्य रेल्वेकडे तीनही आरओबींसाठी ७ कोटी ७५ लाख ९५ हजार २२ रुपये भरण्याचे मान्य करण्यात आले.
या बैठकीला मध्य रेल्वे नागपूर मंडळाचे रेल्वे व्यवस्थापक बृजेश दीक्षित, वरिष्ठ मंडळ अभियंता (समन्वय) संजय खरे, मंडळ अभियंता ए.पी. पवार, राष्ट्रीय महामंडळ विकास प्रधिकरणाचे महाव्यवस्थापक (तांत्रिक) यू.एम. शंभरकर, सहाय्यक एक्सईएन/आरओबी डी.के. शुक्ला, व्यवस्थापक (तांत्रिक) अरविंद काळे, टीम लीडर व्ही.व्ही. नायडू,ओरिएन्टल कन्स्ट्रक्शनचे अभियंता अनुराग गुप्ता उपस्थित होते. बैठकीत राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरओबीला रेल्वेकडून विलंब होत नसल्याचे मान्य केले. प्राधिकरण रेल्वेकडे मानकापूर उड्डाण पुलासाठी ३ कोटी ३९ लाख ३६ हजार २०९ रुपये, गोधनीसाठी १ कोटी ९६ लाख ५१ हजार ६११ रुपये, तर चिचोंडा उड्डाण पुलासाठी २ कोटी ४० लाख ७ हजार २०२ रुपये कोडल चार्जेस तीन दिवसात भरणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
मानकापूर आणि गोधनी आरओबींचे स्ट्रक्चरल डिझाईन व अस्थायी व्यवस्थेचे ड्रॉईंग २० डिसेंबरपूर्वी प्रशासनाला देण्याचे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत मान्य केले. मानकापूर आरओबी ५ जानेवारी २०१३ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन प्रधिकरणाच्या वतीने देण्यात आले. उपरस्त्याचे काम संबंधित कंत्राटदारांच्या वतीने सुरू करण्याचे आश्वासन बैठकीत देण्यात आले. तीनही आरओबींचे काम निर्धारित वेळेत पूर्ण होण्यासाठी रल्वेकडून आवश्यक मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले.
या तीनही निर्माण कार्यावर प्रत्येक १५ दिवसात बैठक घेऊन वेगवेगळ्या समस्या सोडवण्यावर रेल्वे आणि प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांमध्ये एकमत झाले.