प्रवाशांची सुरक्षा आणि त्यांच्या सुखद प्रवासाचा दावा भारतीय रेल्वे करीत असताना मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून सुटणाऱ्या रेल्वेगाडय़ांच्या बोग्यांमधील आसने, स्वच्छतागृहे आणि शौचालयांची दुरवस्था झाल्याने प्रवाशांना दररोज नरकयातनांमधून जाण्याची वेळ आली आहे. नागपुरातून सुटणाऱ्या रेल्वेगाडय़ांच्या प्रवासी डब्यांमधील आसने बसण्यायोग्य नाहीत. त्यावरील गाद्या फाटल्या असून खिळे उघडे पडले आहेत. प्रवाशांना केव्हाही इजा पोहोचू शकते, अशी अवस्था आहे. अनेक गाडय़ांच्या डब्यांची सफाई करण्याचे कंत्राट खासगी कंपन्यांकडे असले तरी अस्वच्छतेने कळस गाठल्याने प्रवासी रेल्वे गाडय़ांमधून प्रवास करणे म्हणजे कचरा डब्यातून प्रवास केल्यासारखे प्रवाशांना वाटते, एवढी वाईट अवस्था झाली आहे.
गाडय़ांतील शौचालये, स्वच्छतागृहांचे दरवाजे तुटलेले आहेत. अशा अवस्थेत प्रवास केल्यानंतर प्रवाशांना त्यांच्या गावी पोहोचल्यानंतर टिटॅनसचे इंजेक्शन घ्यावेच लागते. रेल्वे गाडय़ांची पाहणी करताना प्रवासी गाडय़ांची ही दुरवस्था उघडकीस आली. नागपूर-अमरावती ही प्रवासी गाडी सकाळी ८ वाजता सुटते. या गाडीतील डब्यांच्या स्वच्छतागृहातून पाणी सारखे वाहत असल्याचे आणि अनेक स्वच्छतागृहांना दरवाजे नसल्याचे दिसून आले. त्यासमोर बरेच सामान ठेवलेले होते, त्यामुळे प्रवाशांना आत जाणेही कठीण जात होते. रेल्वे गाडय़ांच्या दुरवस्थेबाबत रेल्वे प्रशासन अनभिज्ञ आहे किंवा रेल्वे गाडय़ांचे देखभालच केली जात नाही, हा एक चिंतेचा विषय आहे. नागपुरातून सुटणाऱ्या रेल्वे गाडय़ांच्या देखभालीकडे विशेष लक्ष देण्याची मागणी नागपूर विभागाचे रेल्वे ग्राहक सल्लागार समितीचे सदस्य डबली यांनी केली आहे.

Story img Loader