मराठी साहित्य प्रांतात परस्परांनी परस्परांचा वैयक्तिक लाभापुरताच विचार करण्याच्या उदयास आलेल्या संस्कृतीने साहित्य संस्था, संमेलने आणि पारितोषिके याचा केवळ बाजार मांडला असून अनिष्ट आणि गैरप्रवृत्तींनी या तथाकथित मुख्य प्रवाही साहित्य संस्था व संमेलनाचा ताबा घेतला आहे. साहित्यिक नसलेले लोक साहित्य संस्थात्मक व्यवहाराच्या केंद्रस्थानी आल्याने त्या संस्था व संमेलन निर्थक ठरत असल्याचा सूर प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने आयोजित परिचर्चेत व्यक्त करण्यात आला.
प्रगतिशील लेखक संघ आणि धरमपेठ राजाराम वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने कवी डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ‘साहित्य संमेलने : सार्थक आणि निर्थक’ या विषयावर परिचर्चा आयोजित करण्यात आली होती. या चर्चेमध्ये झाडीबोली साहित्य संमेलनाचे प्रवर्तक डॉ. हरिश्चंद्र बोरकर, डॉ. प्रकाश खरात, प्रवीण कांबळे, प्रा, शैलेंद्र लेंडे, ख्रिस्ती मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष डॉ. सुभाष पाटील, हेमा नागपूरकर, मराठी बोली साहित्य संघाचे देविदास इंदापवार, आदिवासी साहित्य परिषदेचे संस्थापक नेताजी राजगडकर, बोली चळवळीचे प्रा. हिरामन लांजे, कवी बबन चहांदे, इंद्रजित ओरके आदी मान्यवरांनी विचार व्यक्त केले.
यावेळी डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी म्हणाले, संमेलनाची सार्थकता ही साहित्य विषयक चळवळीने सहिष्णू, धर्मनिरपेक्ष अशी संवेदनशील मानवता जपण्यात असून विविध परिवर्तनवादी छोटी छोटी संमेलन त्यामुळे सार्थक ठरतात. ही संवेदनशीलता जिथे नसते ती संमेलने सत्तेचे, राजकारण्याचे व धनिकांचे कितीही पाठबळ असले तरी निर्थक ठरतात. परिवर्तनवादी संमेलनाची संस्कृती देखील धनसत्तेच्या व राजसत्तेच्या छत्राखाली जाण्याचा धोका आहे. बहुजनामधील नवसामंतवादाच्या व जातीयवादी शक्ती सुद्धा संमेलने गिळंकृत करण्याचा धोका देखील वास्तव असून तसे झाल्यास ही संमेलन सार्थकता घालवून बसण्याचा मोठा धोका या सार्थक संमेलनासमोर देखील उभा ठाकला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांची निर्थकता ही त्याच्या वाटय़ाला याच कारणाने जशी आली आहे, तशीच ती वाङ्मयीन जाण व दृष्टी नसणाऱ्या वाङ्मयीन नेतृत्वाच्या नियंत्रणाखाली गेल्यामुळे अधिक निर्थक ठरत चालली आहे. संमेलनावर विवेकी , सहिष्णू, आणि संवेदनशील लेखक व साहित्यिकांचे संस्थात्मक नियंत्रण होते ते पुन्हा प्राप्त करण्याचे संस्थात्मक बंड संमेलनाच्या सार्थकतेसाठी निर्माण करण्याची गरज असल्याचे डॉ. जोशी म्हणाले.
डॉ. बोरकर म्हणाले, माणसा- माणसांमध्ये व्यक्तिगत जवळीक निर्माण करण्यात व लोकांना सहभागी करून घेऊन त्यांना कृतिप्रवण करण्यासाठी छोटी संमेलने सार्थक ठरतात. धन व राजोत्तेच्या अनुदानामुळे राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप वाढल्यामुळे संमेलने निर्थक ठरू लागली आहे. डॉ. प्रकाश खरात म्हणाले, प्रबोधनशील संविधान संस्कृती निर्माण करण्यातच संमेलनाची सार्थकता आहे.
अल्पसंख्याकाचा आवाज व त्यांचे लेखन ज्या संमेलनामधून मांमडलेच जात नसेल तर सार्थक संमेलन कसे म्हणायचे? असा प्रश्न उपस्थित करून डॉ. सुभाष पाटील म्हणाले, ख्रिस्ती मराठी साहित्यिकाला कोणत्याच पक्तीत बसू दिले न गेल्याने संमेलने वेगळी घ्यावी लागतात, असेही डॉ. पाटील       म्हणाले.
किमान विदर्भाच्या पातळीवर तरी सर्व विविध प्रवाही छोटय़ा संमेलनाचा समन्वय घडून यावा व तशी यंत्रणा उभारली जावी, असा प्रस्ताव नेताजी राजगडकर यांना मांडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा