उन्हाच्या झळांनी अंगाची काहिली होत असताना पंखे, कुलर, एसीच्या गार वाऱ्याच्या आसऱ्यासाठी धावणाऱ्या ठाणे जिल्ह्य़ातील नागरिकांना अघोषित भारनियमनाचे चटके देण्यास महावितरणने सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण होत आहे. दुपारच्या वेळात चार ते पाच तास सलग बत्ती गुल करण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने वीज ग्राहकांमध्ये असंतोष पसरला असून महावितरणच्या कार्यालयातूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने ग्राहकांचा संताप शिगेला पोहोचला आहे. विशेष म्हणजे निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडालेला असताना महावितरणकडून नागरिकांची अशी ससेहोलपट होत असल्याने प्रचार करत आश्वासनांचा पाऊस पाडणाऱ्या उमेदवारांवर नागरिकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे.
फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाळ्याने तीव्र रूप धारण केले असून तापमानाने उच्चांक गाठण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे दिवस-रात्र प्रचंड उकाडा सहन करावा लागत असून घामाघूम नागरिक पंखे, कुलर, एसीचा मोठय़ा प्रमाणात वापर करत आहेत. विजेची मागणी कमालीची वाढली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने महावितरणचे पुरवठा तंत्र कोलमडत असून त्यामुळे नागरिकांना अघोषित भारनियमनाचा फटका सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली हे भारनियमन झाकून टाकले जाते. कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी शहरांमध्ये आठवडय़ातील प्रत्येक दिवशी दुपारच्या वेळात हे भारनियमन सर्रास होत आहे, तर ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेले गोखले रोड, राममारुती रोड या भागांमध्येही दुपारच्या वेळात दीड ते दोन तास वीज गुल होऊ लागली आहे. परीक्षांचा कालावधी असल्याने विद्यार्थाना याचा फटका बसत असून दुकाने, व्यावसायिक आस्थापनांना फटका सहन करावा लागत आहे. लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा धुरळा हवेत उडालेला असताना महावितरणची ही गळचेपी नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण करत आहे. वीजग्राहक संतापी भूमिका मांडत असले तरी लोकप्रतिनिधींनी त्यांना वाऱ्यावर सोडल्याचे चित्र दिसत आहे. वीज गेल्यानंतर संतप्त नागरिक महावितरणच्या आपल्या परिसरातील कार्यालयात फोन करतात. वीज गेल्यानंतर हे फोनसुद्धा अनेक वेळा व्यस्त असतात. काही वेळा तक्रारींचे फोन असतात, तर काही ठिकाणी जाणूनबुजून हे फोन व्यस्त ठेवले जात असल्याचा आरोप ग्राहकांकडून केला जात आहे.
महावितरणचे भारनियमनासंदर्भातील धोरण..
भारनियमन पूर्णपणे बंद असल्याचा दावा महावितरण करत असले तरी ४५ टक्क्यांहून अधिक वितरण हानी असलेल्या भागामध्ये महावितरणने भारनियमन सुरूच ठेवले आहे. सध्या फिडरनिहाय भारनियमन केले जात असून ग्रामीण भागामध्ये त्याचा फटका ३० ते ३५ गावांना बसतो. तर शहरी भागात दीड ते दोन लाख वीजग्राहकांना भारनियमनाचा फटका आजही बसत आहे. भांडुप परिमंडळातील मुंब्रा, दिवा भागामध्ये हे भारनियमन सुरू आहे. सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येकी दीड तास असे भारनियमनाचे वेळापत्रक आहे. कल्याण ग्रामीण भागातही सात तासांचे भारनियमन सुरू आहे.   
देखभाल दुरुस्तीच्या निमित्ताने होणारे वीज बंद..
देखभाल दुरुस्तीचे नेमके काम कधी उद्भवेल याची नेमकी माहिती महावितरणला देता येत नाही. कधी मोठय़ा कामासाठी पाच ते सात तास वीज बंद केली जाते. त्यावेळी एक दिवस अगोदर महावितरण याची माहिती देते. मात्र अचानक उद्भवलेल्या बिघाडाचा कालावधी सांगणे कठीण असते. आठवडय़ातून एक ते दोन दिवस असे शट डाऊन घेतले जाते असे महावितरणच्या भांडुप आणि कल्याण परिमंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा