* हरकती, सूचनांची प्रक्रिया पूर्ण
* खासगी विकसक, शिक्षण संस्थांना परवानगी नाही
* वाशीत प्रायोगिक तत्वावर प्रकल्प
* पार्किंग स्पेस वाढविण्यासाठी तरतूद
अपुऱ्या वाहनतळांमुळे शहरात निर्माण झालेल्या पार्किंगच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने उशीरा का होईना पाउले उचलण्यास सुरुवात केली असून वाहनतळांसाठी पुरेशी जागा उपलब्ध व्हावी, यासाठी खेळाची मैदाने, मोकळ्या जागा, बगीचे अशा ठिकाणी भूमिगत वाहनतळ उभारण्याचे धोरण महापालिकेच्या नगररचना विभागाने राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठविले आहे. महापालिकेची मालकी असलेली मैदाने तसेच उद्याने यांच्या जमिनीखाली वाहनतळांच्या उभारणीसाठी ‘बेसमेंट’चे बांधकाम करण्याची तरतूद नगररचना विभागाने विकास नियंत्रण नियमावलीत केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून या नव्या धोरणावर खोलवर चर्चा करण्यात आली तसेच हरकती, सूचना यासारख्या प्रक्रियेचे सोपस्कारही पूर्ण करण्यात आले. राज्याच्या नगरविकास विभागाच्या अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव पाठविण्यात आला असून त्यानंतरच ही नवी दुरुस्ती अंमलात आणता येणार आहे.
या नव्या तरतुदीचा सरसकट गैरवापर होऊ नये यासाठी खासगी विकासकांना तसेच शहरातील शिक्षण संस्थांना अशाप्रकारे भूमिगत वाहनतळ उभारता येणार नाही, अशी तरतूदही या नव्या दुरुस्तीमध्ये करण्यात आली आहे. मुंबई, ठाण्यासारख्या मोठय़ा शहरांमध्ये पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आला असून वाहनतळांच्या उभारणीसाठी पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध नसल्याचे चित्र प्रकर्षांने दिसू लागले आहे. नवी मुंबईतही गेल्या काही वर्षांपासून वाहनतळांचा प्रश्न गंभीर रूप धारण करू लागला आहे. वाशीसारख्या जुन्या उपनगरात यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. नियोजनातला हा मोठा अडथळा लक्षात घेऊन नवी मुंबई महापालिकेने आता शहरातील ‘पार्किंग स्पेस’ वाढविण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढविण्यास सुरुवात केली आहे.
शहरातील मध्यभागातून जाणाऱ्या नाल्यांवर बांधकाम करून त्याठिकाणी पार्किंग झोन तयार करण्याचा प्रकल्प यापुर्वीच महापालिकेच्या अभियंता विभागामार्फत तयार करण्यात आला आहे. या पाश्र्वभूमीवर महापालिकेच्या मालकीचे असणाऱ्या मोकळ्या भूखंडांखाली बेसमेंटचे बांधकाम करून भूमिगत वाहनतळ उभारण्याची नवी तरतूद विकास नियंत्रण नियमावलीत करण्यात आली असून त्यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. हे वाहनतळ उभारताना मैदान तसेच उद्यानाच्या वरील बाजूस कोणतेही बांधकाम केले जाऊ नये, असे ठरविण्यात आले आहे.
दरम्यान, हा नियम शहरातील खासगी शाळांना तसेच शिक्षण संस्थांना लागू होणार नाही. खासगी शिक्षण संस्थांना जागा देताना सिडकोने मोठय़ा प्रमाणावर मैदानांसाठी जागा वितरित केल्या आहेत. अनेक शिक्षण संस्थांची विस्तीर्ण अशी मैदाने आहेत. अशा मैदानांमध्ये वाहनतळासाठी बेसमेंट तयार करता येणार नाही, अशी तरतूद या नव्या नियमात करण्यात आली आहे. मुख्य रस्त्यापासून साडेचार मीटर क्षेत्रफळाची जागा सोडून असे बांधकाम करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
नवी मुंबईतील मैदानांच्याखाली वाहनतळ
अपुऱ्या वाहनतळांमुळे शहरात निर्माण झालेल्या पार्किंगच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने उशीरा का होईना पाउले उचलण्यास सुरुवात केली असून वाहनतळांसाठी पुरेशी जागा उपलब्ध व्हावी, यासाठी खेळाची मैदाने, मोकळ्या जागा, बगीचे अशा ठिकाणी भूमिगत वाहनतळ उभारण्याचे धोरण महापालिकेच्या नगररचना विभागाने राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठविले आहे.
First published on: 02-02-2013 at 03:30 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Under ground parking in navi mumbai