अंधेरी पश्चिमेतील मोक्याच्या ठिकाणी असलेले शासकीय भूखंड अल्पदरात मिळविणाऱ्या अंबानी रुग्णालय, मुक्ती फाउंडेशन या संस्थांनी तळघरातील पार्किंगला मज्जाव करून आपल्या फायद्यासाठी त्या जागेचा वापर सुरू केल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने दखल घेतली असून लवकरच या संस्थांकडे पार्किंगच्या जागेचा वापर कशासाठी केला जात आहे याबाबत स्पष्टीकरण मागविले जाणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत येणारे हे मोक्याचे भूखंड अत्यंत कमी दरात वितरित करण्यात आले आहेत. यापैकी अंबानी रुग्णालय तसेच मुक्ती फाउंडेशनने तळघरात पार्किंगची व्यवस्था केली आहे. या ठिकाणी येणाऱ्या गाडय़ा रस्त्यावर उभ्या केल्या जात असल्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. काही गाडय़ा खासगी रस्ता असलेल्या मॉडर्न टाउन या परिसरातही उभ्या केल्या जात असल्यामुळे रहिवासी हैराण झाले आहेत. अंबानी रुग्णालय, मुक्ती फाउंडेशन या संस्थांना त्यांच्या अखत्यारीतील जागा पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी मॉडेल टाउन फेडरेशनने केली आहे. तशी सक्ती उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी या संस्थांवर करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय मॉडेल टाउनमध्ये गाडय़ा उभ्या करण्यासाठी पार्किंग शुल्क आकारण्याची परवानगी मागितली आहे. त्यास उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे.
अंबानी रुग्णालय तसेच मुक्ती फाउंडेशन यांच्याकडे तळघरात पार्किंग आहे. परंतु हे पार्किंग अंबानी रुग्णालयाने आपल्या डॉक्टरांसाठी उपलब्ध करून दिले आहे, तर तळघराचा वापर कार्यालयासाठी होत असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तपासणीत निष्पन्न झाले आहे. स्मिता ठाकरे यांच्या मुक्ती फाउंडेशनच्या इमारतीतही तळमजल्यावर पार्किंग उपलब्ध आहे. परंतु या तळघराचा वापर बहुतांश वेळा चित्रीकरणासाठी केला जातो, अशी तक्रारही आमच्याकडे आल्या आहेत. या इमारतीत लेव्हो या रेस्तराँला परवानगी देण्यात आली आहे. या रेस्तराँत येणाऱ्या गाडय़ा मॉडेल टाउनच्या रस्त्यावर उभ्या केल्या जात आहेत. वास्तविक पार्किंग नसल्यास रेस्तराँला पोलिसांचा परवाना मिळत नाही. मात्र सर्रास रस्त्यावर गाडय़ा उभ्या करणाऱ्या लेव्हो रेस्तराँला पोलिसांचा परवाना देण्यात आला आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा