शिक्षण मंडळाची बूट खरेदीही वादात
दरवर्षी गणवेश खरेदीत केल्या जाणाऱ्या घोटाळ्याबरोबरच शिक्षण मंडळाने यंदाच्या बूट खरेदीतही मोठा घोटाळा केल्याचे उघड झाले आहे. मंडळाने ८० रुपयांचे बूट २५२ रुपयांना खरेदी केल्याचे नवे प्रकरण उजेडात आले असून या प्रकरणात ‘लिडकॉम’ हे राज्य शासनाचे अंगीकृत महामंडळही सहभागी झाल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे.
पुणे महापालिका शिक्षण मंडळाने ३०० शाळांमधील ८३ हजार ३५० विद्यार्थ्यांसाठी बूट व मोजे यांची खरेदी केली. जून २०१२ पासून सुरू झालेल्या शैक्षणिक वर्षांसाठी ही खरेदी करण्यात आली असून २७ एप्रिल रोजी हा माल महापालिकेला प्राप्त झाला. त्याचे वाटप जून, जुलैमध्ये करण्यात आले असून मुळात चामडय़ाचे बूट खरेदी करणे अपेक्षित असताना चामडय़ाच्या बुटांचे पैसे देऊन पीव्हीसीचे बूट शिक्षण मंडळाने खरेदी केल्याची लेखी तक्रार रवींद्र बऱ्हाटे यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्तांकडे केली.
सिंथेटिक तसेच पीव्हीसीमध्ये तयार करण्यात आलेले हे बूट अत्यंत हलक्या दर्जाचे असून त्यांची बाजारातील किंमत ८० रुपये आहे. याच बुटांसाठी शिक्षण मंडळाने २५२ रुपये देण्याची तयारी सुरू केली आहे. ही खरेदी पूर्णत: बेकायदेशीर असल्यामुळे दोन कोटी ११ लाख रुपये देण्याची प्रक्रिया थांबवावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. यापूर्वीही अशाच पद्धतीची खरेदी झाली असून लेदर बुटांऐवजी पीव्हीसीचे बूट दरवेळी घेतले जातात, अशी बऱ्हाटे यांची तक्रार आहे.
माल जकात चुकवून आणला
शहरात आणल्या जाणाऱ्या सर्व मालाची जकात भरणे आवश्यक असताना एप्रिल महिन्यात पुरवण्यात आलेल्या बुटांची मात्र जकात भरण्यात आलेली नाही. जकात चुकवूनच हा माल आणण्यात आला असून त्याचे बिल जकातीच्या पावतीविना महापालिका शिक्षण मंडळाला सादर करण्यात आले आहे. असा जकात चुकवून आणलेला माल शिक्षण मंडळाने कसा स्वीकारला असाही प्रश्न आता उपस्थित करण्यात आला आहे.
मुळातच, चामडय़ाच्या वस्तू तसेच चामडे कमवणे या उद्योगाला चालना मिळावी यासाठी राज्य शासनाने लीडकॉमची स्थापना केली असून ते शासनाचे अंगीकृत महामंडळ आहे. महामंडळाने स्वत: तयार केलेल्या वस्तू शासकीय कार्यालयांना पुरवाव्यात. महामंडळाने बाजारातून वस्तू खरेदी करून त्याचा पुरवठा शासनास करू नये, असा स्पष्ट शासन आदेश आहे. तसेच या वस्तूंचा दर्जा आयएसआय मानकाप्रमाणे ठेवावा असेही शासनाने स्पष्ट केले आहे. असा आदेश असतानाही लीडकॉमने पुण्यातील एका व्यावसायिकाला बूट पुरवण्याची ऑर्डर देऊन त्याच्याकडून प्लॅस्टिकचे बूट खरेदी केले आणि ते शिक्षण मंडळाला लेदरचे म्हणून पुरवले, असे बऱ्हाटे यांच्या तक्रारीत म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा