जिल्ह्य़ाच्या धरणगाव तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पालक मंत्री गुलाब देवकर यांनी अधिकाऱ्यांसह भेट देऊन प्रशासनामार्फत टंचाई कृती आराखडय़ातून राबविण्यात आलेल्या उपाय योजनांचा आढावा घेतला.
उपाय योजना तात्पुरत्या स्वरुपात न राबविता कायम स्वरुपी राबविण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. जिल्ह्य़ातील आठ ते दहा तालुक्यात टंचाईची स्थिती निर्माण झाली असून जिल्हा प्रशासनाकडून या गावांमध्ये उपाय योजना केल्या जात आहेत. त्या अनुषंगाने पालकमंत्र्यांकडून तालुकानिहाय टंचाई परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.
देवकर यांनी धरणगाव तालुक्यातील पथराड, पथराड बुद्रुक, शेरी, पष्टाने, पिंपळेसीम, पष्टाने खुर्द, पिंपळे बुद्रुक, साखरे, वराड बुद्रुक अनोरा आदी पाणी टंचाईग्रस्त गावांना भेटी दिल्या.
ग्रामस्थांच्या समस्याही त्यांनी जाणून घेतल्या. टंचाईग्रस्त गावांना मंजूर करण्यात आलेल्या उपाय योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असेही
पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
प्रांत अधिकारी रवींद्र राजपूत यांनी यावेळी नऊ गावात टंचाई
कृती आराखडय़ात विहीर अधिग्रहण योजना राबवून पाणी पुरवठा केला जाणार  असल्याची माहिती दिली.