शहरातील पहिल्यावहिल्या नियोजित उड्डाणपुलाचे प्रलंबित काम सुरू व्हावे यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. निदान यामुळे तरी जिल्हय़ातील झोपलेले तिन्ही मंत्री व या खात्यातील अधिकाऱ्यांना जाग येईल अशी आशा आंदोलकांनी व्यक्त केली.
उपमहापौर गीतांजली काळे, युवा मोर्चाचे सुवेंद्र गांधी तसेच नगरसेवक नितीन शेलार, संगीता खरमाळे, मालनताई ढोणे, अनिल गट्टाणी, बाळासाहेब पोटघन, दादा बोठे, राम भालसिंग, विनोद राठोड, श्रीकांत साठे, तुषार पोटे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते जागरण गोंधळाची संबळ, तुणतुणे, खंजीर, झांज अशी वाद्ये घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयाच्या आवारात त्यांच्याच निषेधार्थ जागरण गोंधळ घालण्यात आला.
उपमहापौर काळे व गांधी यांनी सांगितले, की शहराच्या या अत्यंत महत्त्वाचा विषयावर पालकमंत्र्यांसह सगळे प्रशासन ढिम्म आहे. पालकमंत्री वारेमाप आश्वासने देतात, जिल्हाधिकारीही काम त्वरित सुरू होईल म्हणून सांगतात, प्रत्यक्षात मात्र हा विषय गंभीरपणे घेतला जात नाही. त्यामुळेच ठेकेदाराचे फावले आहे. सक्कर चौकापासून थेट चांदणी चौकापर्यंत रोज होणाऱ्या वाहतूककोंडीतून अनेक अपघात होतात. त्यात अनेकांचे बळी गेले आहेत. तरीही सार्वजनिक बांधकाम खाते ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा उद्योग करत आहे.
भूसंपादन वगैरेसारख्या साध्यासोप्या गोष्टीत वेळ घालवला जात आहे. चौकशी केली की मंत्री, प्रशासन काहीतरी कारणे देत वाटेला लावतात. या एका उड्डाणपुलामुळे वाहतुकीची कोंडी सुटणार आहे, जिवघेण्या अपघातांना आळा बसेल, शहरातील रस्त्यावरचा वाहतुकीचा सगळा ताण कमी होईल. मात्र केवळ ठेकेदाराला नको म्हणून सार्वजनिक बांधकाम खाते पुलाच्या कामाबाबत काहीही निर्णय घ्यायला तयार नाही अशी टीका आंदोलकांनी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अशोक खैरे यांनी आदोलकांसमोर येत त्यांचे निवेदन स्वीकारले व सरकापर्यंत त्यांचे म्हणणे पोहोचवण्याचे आश्वासन दिले.
एकाच शहरातील एकाच कामासाठी एकरकमी निधी देणे अवघड असल्याचे वक्तव्य अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या नगर दौऱ्यात केले. त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी आमदार अनिल राठोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत या विषयावर सर्व संबधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याची मागणी केली. आज याच विषयावर भाजपने अचानक आंदोलन केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह शहरातील सर्वच राजकीय पक्ष या नियोजित पुलाबाबत आग्रही आहेत, मात्र त्यांच्याकडून वेगवेगळी आंदोलने केली जात आहेत.
 

Story img Loader