वास्तविक या चित्रपटाची सुरुवात अतिशय थरारक आणि औत्सुक्य निर्माण करणारी आहे. एक तरुण निखिल डावर (भूप यदुवंशी) जखमी अवस्थेत जंगलातून धावतोय आणि त्याचा पाठलाग पोलीस करत आहेत. पहिल्याच दृश्यातून चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता निर्माण होते, परंतु त्यानंतर उत्सुकता तर राहूच दे, वारंवार सादरीकरणाचे धक्के देत ठरीव वाटेवरून चित्रपट सरकतो आणि मध्यंतरापर्यंत कंटाळा आणतो.
निखिल डावर हा कानपूरचा सुशिक्षित तरुण नोकरीनिमित्त गोव्यात स्थायिक होतो आणि तिथे तो जेसिका (मधुरिमा तुली) या तरुणीच्या प्रेमात पडतो. गोव्यात आपली मैत्रीण कनिष्का (युविका चौधरी) हिच्या घरी तिच्यासोबत राहत असतो. एमबीए झाला असल्यामुळे गोव्याचा बडा उद्योगपती डॅनी डॅगामा (सुदेश बेरी) याच्या कंपनीत तो नोकरीला लागतो. स्वभावाने तापट परंतु आपल्याच तंद्रीत, मस्तीत जगणे हा निखिलचा स्वभाव आहे. कनिष्काशी त्याची चांगली मैत्री होते, परंतु त्याच दरम्यान जेसिका त्याला भेटते आणि त्याचे आयुष्य बदलून जाते. तिच्या प्रेमात तो बेधुंद होतो खरा, परंतु त्यामुळे नजीकच्या कालावधीत आपण मोठय़ा संकटात सापडणार आहोत याची सुतराम कल्पना नसते. राजेश फोगाट (प्रशांत नारायण) हा पोलीस अधिकारी आपला जीवघेणा पाठलाग करून जगणे नकोसे करून सोडेल याची निखिलला कल्पना नसते. हे संकट कोणते आणि त्यातून निर्माण झालेल्या गूढाची उकल यावर चित्रपट बेतलेला आहे. एका नामांकित व्यक्तीची हत्या होते आणि ही हत्या निखिलने केली असे पोलिसांना वाटते आणि ते निखिलला पकडण्यासाठी जंगजंग पछाडतात. आपला पाठलाग पोलीस का करतात याचा सुगावा निखिल कसा लावतो आणि त्यातून आपली सुटका कशी करून घेतो यावर चित्रपट आहे. त्या अर्थाने गूढ हत्येची उकल असे स्वरूप आहे.
पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेतील प्रशांत नारायणचा अभिनय चांगला असला, त्याला प्रमुख भूमिका मिळाली असली तरी सबंध चित्रपटात त्या व्यक्तिरेखेचे महत्त्व ठसविण्यात दिग्दर्शक अपयशी ठरला आहे. नायकाची भूमिका साकारणारा भूप यदुवंशीला पदार्पणात मिळालेली भूमिका असून ती त्याने दिग्दर्शक सांगेल त्याप्रमाणे साकारण्याचा प्रयत्न केला आहे.
पी वाय फिल्म्स प्रस्तुत
सिगारेट की तरह
निर्माते – सुनीता पोद्दार, ब्रन्दा यादव
दिग्दर्शक – आकाशादित्य लामा, छायालेखन – रमेश कृष्णा
संगीत – सुदीप बॅनर्जी, कविता सेठ, अंकुर मिश्रा, विराज सावंत.
कलावंत – भूप यदुवंशी, प्रशांत नारायण, मधुरिमा तुली, युविका चौधरी, सुदेश बेरी, अशोक बांठिया व अन्य.
वेगळेपण फक्त शीर्षकातच..
बॉलीवूडमध्ये बडे कलावंत, गाणी आणि वाट्टेल ते कथानक असले तरी चित्रपट प्रेक्षक पसंतीस उतरतात असे आढळून येते. निव्वळ आणि निखळ करमणूक देण्याच्या नावाखाली प्रेक्षकांना फसविले जाते. त्यामुळे नावात वेगळेपण असणारे, परंतु अजिबात बडे कलावंत नसलेले चित्रपट पाहण्यासारखे असतील अशी अपेक्षा निर्माण होते, परंतु ‘सिगारेट की तरह’ हा चित्रपट ही अपेक्षाही पूर्ण करीत नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 16-12-2012 at 12:29 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uniqueness is only in tital