जाफराबाद तालुक्यातील ५७ मुली बस नसल्याने शाळेत जाऊ शकत नव्हत्या. शिक्षण बंद झाल्याने आई-वडिलांनी मुलींचे विवाह धूमधडाक्यात लावायला सुरुवात केली. त्या किती वयाच्या आहेत? असे बालविवाह कायद्याने योग्य की अयोग्य असले काही त्यांच्या लेखीही नव्हते. पण समस्येच्या मुळापर्यंत पोहोचत माधुरी गणेश पवार या मुलीने ९ सप्टेंबर रोजी रास्ता रोको केला. गावात बस आणली आणि ४० मुली पुन्हा शिकू लागल्या. नुसत्या शिकू लागल्या असे नाही, तर त्यातील काहीजणींचे विवाहदेखील थांबले. केवळ माधुरीच नाही तर तिच्यासारखीच बेबी ठोके. ती परतूर तालुक्यातील साल गावची. शिक्षणाची सोय नसल्याने तिला आजीबरोबर कामावर जावे लागे. मोठय़ा कठीण आर्थिक परिस्थितीत जगणाऱ्या बेबीचेही लग्न ठरविले जात होते. तिने स्वत:च स्वत:चा बालविवाह रोखला. जालना जिल्ह्य़ातील या नवज्योतीचा मुंबईत युनिसेफतर्फे सत्कार करण्यात आला.
बेबी ठोकेच्या संघर्षांची कहाणी मोठी विलक्षण आहे. ती लहान असतानाच तिची आई गेली. वडिलांना दारूचे व्यसन. त्यांनी दुसरे लग्न केले. त्यामुळे तिच्यासह पाच बहिणींचा सांभाळ आजी करते. तेही मजुरीवर. पै-पै जमवून आजीने दोन नातींचे लग्न लावून दिले. जसजशी नात मोठी होत गेली, तसतसे तिनेही आजीला मदत करण्यासाठी मजुरी करायची. बेबी सातवी पास झाली. त्यापूर्वीपासूनच ती आजीबरोबर कामाला जात असे. पुढे गावात शिक्षणाची सोय नव्हती आणि १२-१५ किलोमीटर लांब असणाऱ्या शाळेत बेबीला पाठविण्याची आजीची तयारी नव्हती. शेवटी तिचे लग्न करण्याचे ठरले. पण बेबीने स्वत:च ते थांबविले. मोठय़ा बहिणींनी तिने शिक्षण सुरू ठेवावे, यासाठी आजीला समजावून सांगितले. किशोरी प्रेरिकाही आजीला भेटल्या. आता बेबीला डॉक्टर व्हायचे आहे. ती शिकते आहे.
माधुरी जात्याच तशी बंडखोर. तिचे लग्न तिच्या आत्याच्या मुलाबरोबर ठरले होते. पण केवळ शिकायचे म्हणून तिने स्वत:चा विवाह थांबविला. तेव्हा ती १५ वर्षांची होती. आपल्यासारख्याच आपल्या मैत्रिणींना या संकटाचा सामना करावा लागतो. असे तिचे लक्षात आल्यानंतर गटविकास अधिकारी, तहसीलदार यांच्यापर्यंत समस्या पोहोचवून त्या सोडवणुकीसाठी तिने प्रयत्न केला. तिने  गावात काढलेल्या मोर्चामुळे प्रशासनाचेही तिच्याकडे लक्ष गेले. तिला वकील व्हायचे आहे. जालना जिल्ह्य़ात सामाजिक समस्यांवर काम करणाऱ्या या दोन नवज्योती मुंबईतही चर्चेत आहेत. युनिसेफने त्यांना ‘नवज्योती पुरस्कार’ देऊन सन्मानित केले.

Story img Loader