पुनर्मूल्यांकनात चुका झाल्याच्या, तसेच कमी गुण देण्यात आल्याच्या विद्यार्थ्यांच्या सुमारे ६ हजार तक्रारी नागपूर विद्यापीठाला प्राप्त झाल्या आहेत. परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले होते. तथापि एकतर उत्तरपत्रिकांच्या फेरतपासणीत कमी गुण मिळाल्याच्या (अंडरव्हॅल्युएशन) किंवा त्यात विसंगती आढळल्याच्या ६ हजार तक्रारी विद्यापीठाला मिळाल्या आहेत. गेल्या आठवडय़ापासून दररोज अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे प्रशासन लेखी तक्रारी देण्यास सांगत आहे, परंतु याशिवाय हजारोंच्या संख्येत तक्रारीची पत्रे विद्यापीठाला मिळाली असून ती परीक्षा नियंत्रक विलास रामटेके यांच्याकडे पाठवण्यात आली आहेत.
विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांच्या फोटोकॉपीजमध्येही काही गंभीर चुका आढळल्या असून त्यामुळे हे मूल्यांकनकर्त्यांनी (इव्हॅल्युएटर) मुद्दाम केलेले कृत्य आहे की काय अशी शंका उद्भवत आहे. पेपर तपासण्याऱ्यांनी काही उत्तरांकडे साफ दुर्लक्ष केले आहे, तर काही उत्तरे विषयातील तज्ज्ञांच्या मते बरोबर असतानाही त्यासाठी शून्य गुण देण्यात आले आहेत. गुणांची बेरीज करतानाही अनेक चुका झाल्या आहेत. आपल्या मुलीने उत्तरपत्रिकेची प्रत (फोटोकॉपी) मिळण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी अर्ज करूनही अद्याप ती मिळाली नसल्याचे विद्यापीठात आलेल्या एका पालकाने सांगितले. परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनी त्याला थेट फेरमूल्यांकनासाठी अर्ज करण्याचा चुकीचा सल्ला दिला. त्यामुळे विद्यापीठाने त्याच्या मुलीचा निकाल रोखून ठेवून तिला पुढील सेमिस्टरमध्ये प्रवेश नाकारला आहे.
एवढे कमी आहे की काय, म्हणून विद्यापीठाने अनेक विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकाही हरवल्या आहेत. आम्ही गुणपत्रिकेची दुय्यम प्रत (डुप्लिकेट) मिळण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी अर्ज करूनही आम्हाला ती मिळालेली नाही असे दोन विद्यार्थिनींनी सांगितले. ज्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्या आहेत असे विद्यार्थी मुदतीपूर्वी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकलेले नाहीत.
काही विद्यार्थी आता फेर-पुनर्मूल्यांकनाच्या मागणीसाठी न्यायालयात जाण्याचा विचार करत आहेत. विधि महाविद्यालयाच्या ऋचा इनामदार या विद्यार्थिनीची उत्तरपत्रिका योग्यरितीने तपासली न जाता तिला अनुत्तीर्ण करण्यात आल्याने तिने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. तिच्या उत्तरपत्रिकेच्या मूल्यांकनात गंभीर चुका आढळल्याने न्यायालयाने संबंधित परीक्षकांविरुद्ध आणि विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध ताशेरे ओढून तिला न्याय दिला होता. त्याच धर्तीवर या विद्यार्थ्यांना त्यांच्या वकिलांनी न्यायालयात याचिका करण्याचा सल्ला दिला आहे.    

Story img Loader