राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून भरमसाठ परीक्षा शुल्क घेतले जात असून हे परीक्षा शुल्क गोळा करताना विद्यार्थी व पालकांची दमछाक होत आहे. गोंधळ, विद्यार्थ्यांची तोडफोड, विद्यापीठ प्रशासन आणि प्राधिकरणांवरील वाद, निर्णय क्षमतेचा अभाव अशा विविध कारणांमुळे लोकांच्या नजरेत भरलेल्या नागपूर विद्यापीठात विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्काच्या रूपात अक्षरश: लुट केली जाते. अशी लूट इतर कोणत्याही विद्यापीठात केली जात नाही.
अभियांत्रिकीच्या चार वर्षांदरम्यान विद्यार्थी कोणत्याही सत्रामध्ये अनुत्तीर्ण झाल्यास एटीकेटी लागून त्याला वरच्या वर्गात पेपर देण्याची मुभा आहे. एटीकेटी मर्यादित विषयांसाठीच दिली जाते. इतर विद्यापीठांप्रमाणेच नागपूर विद्यापीठानेही गेल्या दोन वर्षांपासून सत्रनिहाय अभ्यासक्रम सुरू केले आहेत. त्यासाठी मोठे शुल्क विद्यार्थ्यांकडून वसूल केले जाते. इतर विद्यापीठे ५०० ते १४०० रुपये शुल्क विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्कापोटी घेत असतील तर नागपूर विद्यापीठ २२०० ते २५०० रुपये शुल्क आकारते. एवढेच नव्हे तर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात १२०० ते १४०० रुपये वार्षिक शुल्क परीक्षेपोटी घेतले जाते. मात्र, नागपूर विद्यापीठ त्याच अभ्यासक्रमासाठी ४३०० ते ५००० रुपये शुल्क आकारते. सेमिस्टर पद्धत सुरू करताना प्राधिकरणातील सदस्यांनी हा विषय उपस्थित केला. मात्र, त्यावर काहीही होऊ शकले नाही. आजही विद्यार्थ्यांकडून अव्वाच्या सव्वा शुल्क विद्यापीठ वसूल करते. अंबिका शर्मा या विद्यार्थिनीच्या मते, एवढे परीक्षा शुल्क घेऊन या पैशाचा उपयोग नेमका कोणत्या कारणासाठी केला जातो, याची माहिती आम्हाला नाही. दुसऱ्या व तिसऱ्या सत्राच्या काही पेपर्समध्ये ती अनुत्तीर्ण झाली, तेव्हा तिला त्या सत्राचे पूर्ण परीक्षा शुल्क २२०० प्रती पेपरमागे भरावे लागले.