२०१४-१५ शैक्षणिक वर्षांत नवीन पदवी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यासाठी एकूण २६ प्रस्ताव महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठास प्राप्त झाले असून त्यातील १९ प्रस्तावांची विद्यापीठाने शासनास शिफारस केली आहे. आरोग्य शिक्षणबाबतीत दर्जेदार शिक्षण देणे ही महत्वपूर्ण बाब असून त्याबाबत प्रस्ताव सादर करताना सर्व अटी व नियमांची पूर्तता करणाऱ्या महाविद्यालयांना नवीन महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी दिली जाईल, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी दिली.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे नवीन महाविद्यालय सुरू करणे, पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करणे तसेच संलग्नित महाविद्यालय व अभ्यासक्रमांची विद्यार्थी प्रवेश क्षमता वाढ करण्यासाठी या प्रक्रियेबाबत इच्छुक संस्थाचालकांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष मार्गदर्शनपर समुपदेशनाची बैठक गुरुवारी पार पडली. यावेळी डॉ. जामकर बोलत होते. विद्यापीठाच्या बृहत आराखडय़ानुसार वैद्यकीय शिक्षणाचे संपूर्ण राज्यात समन्याय वाटप होण्यासाठी नियोजन करता येत आहे. त्यासाठी विद्यापीठ दर पाच वर्षांनी बृहत आराखडा तयार करते. संस्थाचालकांनी प्रस्ताव सादर करताना सर्व बाबींचा विचार करावा.
महाविद्यालये सुरू होतात. परंतु, योग्य नियोजनाअभावी आणि आवश्यक सुविधा नसल्याने तसेच विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद आदी कारणास्तव ती बंद होण्याचे प्रमाण वाढत आहे. प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक आरोग्य शास्त्राचे शाखानिहाय महाविद्यालय असावे. आदिवासी व मागास भागात महाविद्यालय सुरू करण्यासाठी सूट मिळत असते, असेही जामकर यांनी सांगितले. महापालिका क्षेत्रात प्रत्येकी पाच लाख लोकसंख्येमागे एक महाविद्यालय सुरू करण्याची परवानी देता येणार आहे.
महापालिका क्षेत्रात महाविद्यालयांची गणना जिल्ह्यांच्या संख्येत करण्यात येणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. विद्यापीठाने शिफारस केलेल्या प्रस्तावांमध्ये वैद्यकीय चार, दंत सहा, आयुर्वेद एक, बी.एस्सी नर्सिग पाच, पीबीबीएस्सी तीन महाविद्यालयांचा समावेश आहे.
विद्यापीठाकडून नव्या १९ वैद्यकीय महाविद्यालयांची शिफारस
२०१४-१५ शैक्षणिक वर्षांत नवीन पदवी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यासाठी एकूण २६ प्रस्ताव महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठास प्राप्त झाले असून त्यातील १९ प्रस्तावांची विद्यापीठाने शासनास शिफारस केली आहे.
First published on: 12-09-2014 at 02:28 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: University recommended 19 new medical colleges