भगतसिंग यांचे पाकिस्तानात असलेले अप्रकाशित साहित्य येत्या जूनअखेर भारतात आणण्यात येणार आहे, अशी माहिती भगतसिंग यांचे बंधू कुलबिरसिंग यांचे नातू अभितेजसिंग संधू यांनी पुण्यात दिली. एच. एस. देसाई महाविद्यालय अभ्यासिकातर्फे आयोजित शहीद स्मृती कार्यक्रमात तरूणांशी संवाद साधला. अभितेजसिंग म्हणाले,‘‘भगतसिंग तुरूंगात असताना त्यांनी केलेले अप्रकाशित  लिखाण पाकिस्तानमध्ये आहे. ते भारतात परत आणण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून मे-जून अखेर ते भारतात परत आणले जाईल.’’ रामप्रसाद बिस्मील, अशफाक उल्ला खान आणि रोशनसिंग ठाकूर यांच्या स्मृतिदिनी बुधवारी त्यांची आठवण करीत भगतसिंग यांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. संस्थेचे अध्यक्ष हसमुखभाई पटेल, महाविद्यालयाचे प्राचार्य मोहिते तसेच आबासाहेब राऊत, दत्ता पवार उपस्थित होते. ‘‘भगतसिंग यांच्या जन्मदिवशी त्यांचे वडील आणि आजोबांची तुरूंगातून सुटका झाली. त्यामुळे त्यांच नाव भगतसिंग असे ठेवले. भगतसिंगांचा लढा हा शोषितांना मुक्त करण्याचा होता. हा लढा व्यक्तीविरूध्द नव्हे, तर शासकाविरूध्द होता. मी भगतसिंग यांचा वारस असल्याचा मला अभिमान आहे, पण तुम्ही सर्व जण त्यांच्या विचाराचे वारस आहात. तरूणांनी जाती, धर्माच्या भिंती पाडून शासनात भाग घेतला पाहिजे. काही लोकांनी जाणीवपूर्वक भगतसिंग यांना विशिष्ट चौकटीत बंद केले,’’ असे ते म्हणाले. ‘‘नक्षलवादाची एकांगी बाजू मांडली जाते. देशातील गरीब आणि श्रीमंत ही दरी वाढत आहे. शहिदांच्या स्वप्नातील भारत आपण आजही निर्माण करू शकलो नाही. भगतसिंगांचे तत्त्वज्ञान पिस्तूल आणि बॉम्बच्यापलीकडील आहे. भगतसिंगांचे तत्त्वज्ञान जनतेपर्यंत पोहोचू दिले जात नसले, तरी जनतेच्या हृदयातील भगतसिंग कुणालाही मिटवता येणार नाही. गांधींच्या हस्तक्षेपाने त्यांची फाशी रद्द झाली असती. बेरोजगारी, गरिबी आणि निरक्षरता आहे, तोपर्यंत लोकशाही ही हुकूमशाहीच आहे. विद्यार्थ्यांनी प्रशासनात जाऊन परिवर्तनाचे काम करावे,’’ असे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा