रविवारी रात्री आठच्या आसपास शिवतीर्थावरील लाखोंचा जनसागर जड अंतकरणाने घराच्या दिशेने चालू लागला. रात्री दहा वाजेपर्यंत जवळपास संपूर्ण शिवतीर्थ रिकामे झाले.. कुठेही अनुचित घटना न घडता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या महा(अंत्य)यात्रेचा समारोप झाला अन् वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अक्षरश: सुटकेचा निश्वास सोडला..
पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग, सहआयुक्त हेमंत नगराळे (प्रशासन), हिमांशू रॉय (गुन्हे), सदानंद दाते (कायदा व सुव्यवस्था), विवेक फणसाळकर (वाहतूक) यांच्यासह अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्तांचा ताफा महायात्रेच्या बंदोबस्तात गुंतला होता. तब्बल २० हजार अतिरिक्त पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाच्या तब्बल १५ तर धडक कृती दलाच्या तीन तुकडय़ा महायात्रेच्या मार्गावर तैनात होत्या.. पोलिसांना बंदोबस्त ठेवण्यासाठी जागाच नव्हती इतका महासागर लोटला होता.. मातोश्री ते शिवतीर्थ आणि प्रत्यक्ष शिवतीर्थ अशी बंदोबस्ताची आखणी करण्यात आली होती. मातोश्री ते सेनाभवन नगराळेंकडे, सेनाभवन ते शिवतीर्थ आणि शिवतीर्थावरील बंदोबस्त रॉय आणि उर्वरित कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी दातेंवर सोपविण्यात आली होती. स्वत: आयुक्त समन्वय साधून होते. वास्तविक डॉ. सिंग यांच्या मुलीचा – रिचाचा- गोरेगावच्या एसआरपी ग्राऊंडवर रविवारी स्वागत समारंभ होता.. तो पुढे ढकलत आयुक्तांनी पहाटेपासूनच बंदोबस्ताची पाहणी करण्यास सुरूवात केली होती.. सैनिकांचा अथांग महासागर शनिवारी मध्यरात्रीपासूनच मातोश्रीच्या दिशेने सरकला होता.. तेव्हाच या ‘न भुतो, न भविष्यती’ महायात्रेची कल्पना आली होती, असे डॉ. सिंग यांनी स्पष्ट केले.
बाळासाहेबांबद्दलच्या भावना व्यक्त करताना शिवसैनिकांना कोणतीही अडचण येऊ नये या रीतीने सहज बंदोबस्त होता.. कुठलीही आडकाठी नव्हती.. तरीही एक नजर सतत भिरभिरत होती.. वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील सीसीटीव्ही यंत्रणेवर अधिकाऱ्यांचा एक गट रात्रंदिवस नजर ठेवून होता.. गर्दीतील अनपेक्षित बाबींकडे डोळ्यात तेल घालून पाहत होता.. याशिवाय संपूर्ण मार्गावर फिरत्या कॅमेऱ्याचीही टेहळणी होती.. शिवतीर्थावर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा जथ्थ्या वाढतच चालला होता. सगळेच दिग्गज दुपारी दोनच्या आसपासच येऊन पोहोचले होते.. त्यामुळे महापौर बंगल्यासारखे सुरक्षित ठिकाण पोलिसांना दुसरे कुठलेही आढळले नाही.. सव्वाचारच्या सुमारास पार्थिव आणले गेले आणि अनेक पुढाऱ्यांसोबत अनेक हवशे-नवशे-गवशे आत शिरले. अगदी काळजीपूर्वक पोलिसांनी ही परिस्थिती हाताळली.. कथित शिवसैनिक पोलिसांचेच काही ऐकायला तयार नव्हते.. त्यांना विनम्रपणे एका बाजुला उभे राहण्याची विनंती पोलिसांकडून केली जात होती.. त्याचवेळी शिवसेनेचे माजी आमदार अरविंद सावंत मात्र,पोलिसांनी आधी बाहेर व्हा, असा घोष करीत होते.. या घोषणेने क्षणभर पोलीसही स्तब्ध झाले.. पण त्याला आक्षेप घेण्याची ती वेळ नव्हती.. समोर बाळासाहेबांचे पार्थिव अनंतात विलिन होण्याची प्रतीक्षा करीत होते.. हिमांशू रॉय यांनी आपल्या नेहमीच्या विनम्रतेने मार्ग मोकळा केला.. पोलिसांची सलामी दिली गेली अन् मग आसमंतातील नीरव शांतता अधिकच गडद झाली.. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींपेक्षा बाळासाहेबांच्या कडव्या शिवसैनिकांनी अभूतपूर्व शिस्तीचे दर्शन घडविल्याने पोलिसांना सुटकेचा निश्वास सोडता आला..

Story img Loader