एकूण ६,५४० तंटय़ांची सोडवणूक
गावातील शांततेचे वातावरण विकास प्रक्रियेला पोषक ठरत असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ग्रामीण भागातील तंटा -बखेडय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या अभियानातील एकूणच कामगिरीचा वेध लेखमालेतून घेण्यात येत आहे. मालेतील पंधरावा लेख.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत जळगाव जिल्ह्यात जानेवारी २०१३ अखेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे ३२, ३२६ तंटे दाखल झाले असून त्यापैकी ६,५४० तंटे सामोपचाराच्या माध्यमातून मिटविण्यात आले आहेत. मिटलेल्या तंटय़ांमध्ये सर्वाधिक प्रमाण फौजदारी तंटय़ाचे असून महसुली स्वरूपाचा एकही तंटा अद्याप मिटलेला नाही.
गावपातळीवर तंटे निर्माण होऊ नयेत म्हणून उपक्रम राबविणे या मोहिमेत अपेक्षित असले तरी त्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळविणे तसे अवघडच. यामुळे दाखल असलेले व नव्याने निर्माण होणाऱ्या तंटय़ांचे निराकरण करून ते कमी करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून गावात शांततेचे वातावरण प्रस्थापित करतानाच प्रशासकीय व न्याय व्यवस्थेवरील वाढता भारही कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. या मोहिमेंतर्गत स्थावर मालमत्तेचे मालकीहक्क, वारसाहक्क, वाटप, हस्तांतरण, शेतीचे मालकीहक्क, वारसाहक्क, अतिक्रमणे, शेतात जावयाचा रस्ता आदी कारणांवरून निर्माण झालेले तंटे, मालमत्ता व फसवणूक यासंबंधीचे अदखलपात्र व दखलपात्र फौजदारी गुन्ह्यांपैकी जे गुन्हे संबंधित पक्षकारांच्या सहमतीने व कायद्यानुसार मिटविता येऊ शकतात, असे तंटे तसेच सहकार, कामगार, औद्योगिक क्षेत्रातील व इतर तंटे सामोपचाराच्या माध्यमातून सोडविण्यास परवानगी देण्यात आली आहे. मोहिमेच्या सहाव्या वर्षांत म्हणजे २०१२-१३ या कालावधीत जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत दिवाणी स्वरूपाचे ८१०७, महसुली ५३९, फौजदारी २२९२४ आणि इतर ९५६ असे एकूण ३२,३२६ तंटे दाखल झाले आहेत. या मोहिमेंतर्गत त्यातील महसुली स्वरूपाचे दहा आणि फौजदारी स्वरूपाचे ६५३० असे एकूण ६,५४० तंटे सामोपचाराने मिटविण्यात यश मिळाले. म्हणजे दिवाणी व इतर तंटय़ातील एकही तंटा अद्यापपर्यंत मिटलेला नाही. तंटय़ांची एकूण संख्या आणि मिटलेल्या तंटय़ांचे प्रमाण लक्षात घेतल्यास अजून २५, ७८६ तंटे प्रलंबित असल्याचे लक्षात येते. स्थायी व समतोल विकासासाठी सामाजिक शांतता व सुरक्षितता महत्त्वाची भूमिका बजावते. शांतता व सुरक्षिततेचे वातावरण नसल्यास कोणतीही व्यक्ती वा समाज विकास साधू शकत नाही. ही बाब लक्षात घेऊन शासनाने गावातील तंटे गाव पातळीवर मिटविले जावेत आणि गाव पातळीवर नव्याने तंटे निर्माण होवू नयेत, या स्वरूपात तंटामुक्त गाव योजनेची आखणी केली आहे.
ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला तंटामुक्त गाव समितीची स्थापना करणे बंधनकारक आहे. जळगाव जिल्ह्यातील १५ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात ११३९ तंटामुक्त गाव समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. तंटे मिटविण्याच्या कामात ही समिती मध्यस्थ व प्रेरकाची भूमिका बजावते. या समित्यांमार्फत तंटे सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. गावातील ग्रामस्थांना मोहिमेबद्दल मार्गदर्शन करून सहभागी करून घेणे, तंटे निर्माणच होऊ नयेत म्हणून प्रयत्न करणे, नव्याने निर्माण होणारे तंटे मिटविणे याची जबाबदारी समितीवर सोपविण्यात आली आहे. या कामात आवश्यकतेनुसार पोलीस अधिकारी, बीट अंमलदार, प्रशासकीय यंत्रणा व कायदेतज्ज्ञ यांची मदत घेता येते. या समित्यांनी आता फौजदारी तंटय़ांप्रमाणेच दिवाणी, महसुली व इतर तंटे सोडविण्याकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
जळगावमध्ये महसुली तंटे सोडविण्यात अपयश
गावातील शांततेचे वातावरण विकास प्रक्रियेला पोषक ठरत असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ग्रामीण भागातील तंटा -बखेडय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या अभियानातील एकूणच कामगिरीचा वेध लेखमालेतून घेण्यात येत आहे. मालेतील पंधरावा लेख.
First published on: 21-02-2013 at 03:51 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unsucess in sloved the quarrel in jalgaon