जुळे सोलापुरातील जानकीनगरात उद्यानासाठी असलेल्या आरक्षणानुसार दोन एकर जागा संपादन करावी व त्यासाठी अधिसूचना काढावी अशी मागणी करीत भाजपचे स्थानिक नगरसेवक नरेंद्र काळे यांच्यासह पंधरा कार्यकर्त्यांनी सोलापूर महापालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
दरम्यान, या आरक्षणाप्रमाणे पालिका प्रशासनाने कार्यवाही करावी म्हणून काँग्रेसचे आमदार दिलीप माने यांनी गुरुवारी पालिकेत येऊन उपोषणार्थी नगरसेवक काळे यांची भेट घेतली. नंतर त्यांनी आयुक्त अजय सावरीकर यांच्याशीही चर्चा केली.
शेकडो गृहनिर्माण प्रकल्प असलेल्या जुळे सोलापुरात जानकीनगर येथे उद्यानासाठी महापालिकेने दोन एकर जागेवर आरक्षण ठेवले आहे. या आरक्षणानुसार मूळ जागामालकाने सदर दोन एकर भूखंड पालिकेने खरेदी करावा म्हणून पत्रव्यवहार केला आहे. परंतु पालिका प्रशासन याबाबत ढिम्मच आहे.
या पाश्र्वभूमीवर जुळे सोलापुरातील नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. या प्रश्नावर पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक काळे यांनी गुरुवारपासून पालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केले. त्यांच्या सोबत सतीश भोसले, सुभाष काळदीप, संतोष माळी, दीपक बडदाळ आदी अन्य कार्यकर्ते व नागरिकांनीही उपोषणात सहभाग घेतला आहे. पालिका प्रशासनाने जानकीनगरातील उद्यानासाठी आरक्षित असलेल्या दोन एकर जागेच्या संपादनासाठी अधिसूचना जारी करून जागा खरेदीसाठी एकूण दोन कोटी ४० लाख रुपये किमतीपैकी निम्मी रक्कम जमा करावी. ही रक्कम न भरल्यास व अधिसूचना न काढल्यास सदर भूखंड मूळ मालकाच्या ताब्यात परत जाण्याची भीती असल्याने आपण उपोषणाचा मार्ग पत्करल्याचे नगरसेवक काळे यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा