आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध लागलेले असतांनाच पक्षांतर्गत उमेदवारी निश्चित करण्याचे डावपेच रचले जात आहेत. या पाश्र्वभूमीवर भिन्न पक्षात असणाऱ्या खासदार दत्ता मेघे-रामदास तडस या गुरू-शिष्याच्या अतूट ऋणानुबंधाची कसोटी लागल्याने हा पट्टशिष्य पक्षाला की गुरूला दक्षिणा देणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी पक्षांतर्गत चर्चा झडू लागल्या आहेत. विदर्भातील काही जागांवर उमेदवार निश्चितकरून त्यांना कामाला लागण्याची सूचना भाजप श्रेष्ठींनी दिल्याचे पूर्वीच उघड झाले आहे. नागपूर- नितीन गडकरी, चंद्रपूर- हंसराज अहिर, वर्धा- रामदास तडस, अकोला- संजय धोत्रे, अशी नावे निश्चित झाल्याचे वृत्त लोकसत्ताने सहा महिन्यांपूर्वी प्रकाशित केले होते. त्यानंतर रामदास तडस यांनीही यास दुजोरा देऊन पक्षाने आपल्याला यासंदर्भात सूचित केल्याचे मान्य केले. याच वर्धा लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार कांॅग्रेसचे दत्ता मेघे यांनी पुन्हा येथूनच उभे राहण्याचे जाहीर करून टाकले. त्यापूर्वी पूत्र सागरसाठी प्रयत्नशील असल्याचेही मेघे नेहमीप्रमाणे बेधडक बोलले. मेघे वध्र्याची दावेदारी सोडणार नसल्याचे स्पष्ट असतांनाच अ.भा.कॉंग्रेस समितीच्या सदस्य चारुलता टोकस यांनीही प्रबळ दावेदारी चालविली. कॉंग्रेस-भाजपच्या या उमेदवारांना निवडून येण्याची ठाम खात्री आहे, पण विरोधक कोण, यावरच त्यांचे विजयाचे अंदाज आहेत.
मेघे-तडस हा संभाव्य सामना या चित्रातून उमटतो, पण राजकीय धुरीण हे स्वीकारत नाही. यामागे मेघे-तडस कुटूंबाचा असलेला घरोबा, हेच प्रमुख कारण आहे. लाल मातीतले शरीर सौष्ठव मिरवत विदर्भकेसरी झालेल्या तडसांनी देवळी पालिकेच्या आखाडय़ात दमदार उपस्थिती दाखविली होती, पण त्यांना राजकीय सौष्ठव प्राप्त करून देण्यात मेघेंनीच त्यावेळी मोलाची कामगिरी बजावली. सर्व ती मदत करून दोन वेळा तडसांना विधान परिषदेचे आमदार म्हणून निवडून आणून मेघेंनी वर्धा जिल्ह्य़ात पट्टशिष्य तयार केला. राम-हनुमानाची जोडी म्हणून मेघे-तडसांची राजकीय ओळख प्रस्थापित झाली होती. मेघेंसाठी पडेल ती जबाबदारी यशस्वी पार पाडत तडसांनीही श्रध्देची पदोपदी पावती दिली. या जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीच्या स्थापनेत हेच दोघे अग्रभागी राहिले, पण पुढे मेघेंनी गुरूची फोरकत घेत कॉंग्रेसला जवळ केले, तर तडस गुरूंचे गुरू शरद पवारजवळच स्थिरावले. राजकीय आखाडे बदलले, पण तडसांनी मेघेनिष्ठेची माती सदैव भाळी मिरवली. आता याच निष्ठेची कसोटी लागली आहे. मेघेंविरुध्द उभे राहणार काय, या स्पष्ट विचारणेवर तडस म्हणाले की, पक्ष देईल तो निर्णय मान्य करू. मेघे माझे श्रध्दास्थान आहेत व राहणार, पण पक्षीय राजकारणाचे आव्हान आहेच. कांॅग्रेसकडून टोकस यांची उमेदवारी आल्यास त्यांना मीच टक्कर देणार, असा पवित्रा तडसांनी व्यक्त केला. मेघे किंवा त्यांच्या कुटूंबातील उमेदवारी आल्यास तडस उभे राहणार नाहीत, हे जवळजवळ ठरलेलेच आहे, असे तडस गटाचे निष्ठावंत सांगतात. तडसांचे कुटूंबही अशा लढतीमुळे आमच्यापुढे पेचच राहणार असल्याचे नाकारत नाही. असा हा ऋणानुबंध आहे. लाल मातीतून काढून पद, पत व पैसा बहाल करणाऱ्या मेघेंना निवडणुकीच्या रणांगणात शिव्या कशा घालणार, हा प्रश्न पडलेल्या तडस गटाच्या एका विश्वासूने तडससाहेब काही नाती आजही पाळतात, असे ठामपणे सांगितले.
मध्यंतरी मेघे कुटूंबाच्या एका लग्न सोहळ्यात नितीन गडकरी, रामदास तडस, जयदत्त क्षीरसागर व दत्ता मेघे यांची बैठक रंगली. त्यात क्षीरसागर यांनी तडसांना कोणती जबाबदारी देणार, असा प्रश्न गडकरींना टाकल्यावर केवळ हास्याचे फ वारे उडाले. भाजप-कॉंग्रेस-राकॉं अशा या गोतावळ्यातील नेत्यांना पक्षनिष्ठेएवढेच व्यक्तिगत संबंधाचेही भान आहे, हेच दिसून आले. मेघे-तडस यांची लढत व्हावी, असे या दोघांच्याही पक्षांतर्गत विरोधकांना वाटते. सुंठीवाचून खोकला जाण्याचा यामागे हेतू आहे. जातीय समीकरण ही दुसरी बाब आहेच. मेघेंना तेली समाजाचे पाठबळ लाभत आल्याचे आजवरचे राजकीय चित्रपटल आहे, पण रिंगणात तडस असतील तर हे पाठबळ मिळेलच, याची खात्री कुणी देत नाही. तडसांना हे आव्हान अर्थातच श्रेष्ठींच्या सांगण्यावरूनच पेलावे लागणार. त्यांचे श्रेष्ठी असलेले मेघेंचे मित्र यांचे मेतकुट लपून नाही. मेघेही ते लपवत नाही. या पाश्र्वभूमीवर वर्धा मतदारसंघातील आगामी लढतीबाबत नावापुरतेच औत्सुक्यम्हटल्यास वावगे ठरणार नाही. विधानसभा निवडणुकीचा पर्याय आहेच, असे तडस गट म्हणतो, त्यातील अर्थही स्पष्ट होतो.
गुरू-शिष्याच्या अतूट ऋणानुबंधाची आगामी लोकसभा निवडणुकीत कसोटी
आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध लागलेले असतांनाच पक्षांतर्गत उमेदवारी निश्चित करण्याचे डावपेच रचले जात आहेत. या पाश्र्वभूमीवर भिन्न पक्षात असणाऱ्या खासदार दत्ता मेघे-रामदास तडस या गुरू-शिष्याच्या अतूट ऋणानुबंधाची कसोटी लागल्याने हा पट्टशिष्य पक्षाला की गुरूला दक्षिणा देणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
First published on: 16-01-2013 at 03:18 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Up comeing loksabha electionexam of relations of guru shishya