लोकसभा निवडणुकीत ‘यूपीए’ला यंदा राज्यात ३० पेक्षा जास्त जागा मिळतील, तसेच विदर्भात १९८० व ८५ मध्ये मिळाल्या होत्या तेवढय़ा जागा मिळतील, असा होरा काँग्रेसचे प्रवक्ते खासदार हुसेन दलवाई यांनी रविवारी नागपुरात व्यक्त केला.
काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी ते विदर्भात आले आहेत. मागील २००४ व २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद होते. परिणामी, ‘यूपीए’ला काही जागा कमी मिळाल्या. आता मात्र तसे नाही. दोन्ही पक्षांचे तसेच आघाडीतील सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते एकसंघपणे काम करीत आहेत. त्याचा परिणाम चांगला होत आहे. १९८० व १९८५ मध्ये होती तशीच परिस्थिती यंदा आहे. तेव्हा जेवढय़ा जागा मिळाल्या होत्या तेवढय़ा जागा मिळतील. महायुतीत याच्या अगदी विरुद्ध परिस्थिती आहे. महायुतीमधील नेत्यांची आपसात भांडणे सुरू आहेत. संघाचा अनाठायी हस्तक्षेप भाजपमध्ये वाढत आहे. भाजप हा संघाचा फ्रंट आहे काय, असा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप दलवाई यांनी केला.
हुसेन दलवाई यांनी भाजप तसेच रा.स्व. संघावर टीकेची राळ उठविली. गुजरातमध्ये सर्वाधिक विकासाची फेकुगिरी सुरू असून कुपोषण, बालमृत्यूचे प्रमाण सर्वाधिक गुजरात व मध्य प्रदेशात आहे. गुंतवणूक गुजरातपेक्षा महाराष्ट्रातच जास्त झाली असून मोदींचा विकासाचा फुगा फुटला आहे. नागपूर व मुंबई महापालिकेत विकासाची कामे ठप्प झाली आहेत. आयुक्त कार्यक्षम असूनही त्यांना कामे करूच दिली जात नाहीत. ओसीडब्ल्यूत गैरप्रकार झाला आहे. शासनाने दिलेला निधीचा गैरवापर केला जात असून महापालिका दिवाळखोरीच्या स्थितीत आणली गेल्याचा आरोप दलवाई यांनी केली.
अनिल वासनिक व हैदरअली दोसानी व इतर नेते पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

 

Story img Loader