जळगाव जिल्ह्यातील कुऱ्हा वढोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेची किंमत २०७ वरून ८४२ कोटी तर ६८९ कोटीची बोदवड परिसर सिंचन योजनेची किंमत जवळपास दुप्पट म्हणजे १५०० कोटीहून अधिकवर गेली आहे. यातील बोदवड सिंचन योजनेवर आतापर्यंत १८ कोटी इतका म्हणजे २५ टक्क्यांहून कमी खर्च झाला असल्याने ती गुंडाळली जाण्याच्या मार्गावर आहे.
उपसा सिंचन योजनांच्या उपयोगितेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे श्वेतपत्रिकेतही आवश्यकता भासल्यास अपवादात्मक स्थितीत नव्या योजना मांडण्याचे धोरण स्वीकारले जाणार असल्याचे लक्षात येते. मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा वढोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेचा खर्च १२ वर्षांच्या काळात जवळपास तिपटीने वाढल्याचे लक्षात येते. म्हणजे, प्रारंभी योजनेला मंजूरी देऊन नंतर तिची अंदाजपत्रके वाढविली जातात, असा जो आक्षेप यापूर्वी तांत्रिक सल्लागार समितीच्या सदस्याने नोंदविला, त्यास पुष्टी देईल असा हा प्रकार म्हणता येईल. या योजनेच्या उपसा सिंचन प्रणालीचे काम डिसेंबर २००८ मध्ये सुरू झाले. टप्पा क्र. एकच्या जॅकवेलचे ३५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित प्रगतीपथावर आहे. इस्लामपूर धरण व धरणाची संलग्न कामे २००९ मध्ये सुरू झाले. धरणाच्या जलरोधक खंदकाचे काम व माती भरावाचे काम प्रगतीपथावर आहे. धरणाचे २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. संपूर्ण कालवा व वितरिका प्रणाली बंदीस्त वाहिनी प्रस्तावित कालवा व वितरिकांची कामे पूर्णपणे बाकी आहेत. या योजनेची किंमत वाढण्यास दरसुचीतील वाढ २६२ कोटी, भूसंपादन व पुनर्वसन, वनजमीन खर्चातील वाढ २५.६२ कोटी, प्रकल्प व्याप्तीतील बदल २३९.९१ आणि इतर कारणांमुळे १०७.५२ कोटींची वाढ झाली. प्रकल्पास विलंब होण्यास मुळ प्रस्तावानुसार वन मान्यता मिळाली नाही. त्यामुळे धरणाची जागा वन क्षेत्राच्या बाहेर घेण्यात आली. अपुऱ्या निधीची तरतुदीमुळे ते काम रखडले, असे जलसंपदा विभागाने म्हटले आहे.
बोदवड तालुक्यातील बोदवड परिसर सिंचन योजनेचा खर्चही दामदुपटीने वाढला असला तरी आता या प्रकल्पाचे भवितव्य अधांतरी आहे. या योजनेस १९९९ मध्ये मान्यता देण्यात आली होती. साळशिंगी धरणासाठी ५३५ हेक्टर वन जमिनीसाठी निव्वळ वर्तमान मुल्यांपोटी ४७.६१ कोटी एवढी रक्कम वनखात्यास वर्ग करावी लागणार होती. तसेच एक लाख १७ हजार झाडे तोडावी लागणार होती. तसेच रुईखेडा धरणासाठी वनजमिनीची आवश्यकता होती. यामुळे योजनेबाबत पुन्हा अभ्यासाचे नियोजन करण्यात आले. मूळ प्रस्तावातील पाच धरणांपैकी धरणात कोणतीही बदल न करता उर्वरित साळशिंगी, रुईखेडा व शेलवड ही धरणे रद्द करून जामठी धरणाची पाणी साठवण क्षमता ७.६५ वरून ७२.६४ दशलक्ष घनमीटर एवढी वाढविण्यात आली. उपसा प्रणालीच्या टप्पा दोनच्या उद्भवात बदल, पंपिंग यंत्रणा आदीत वाढ झाली. जादा किंमतीच्या निविदेमुळे १७.३९, प्रकल्पाची किंमत वाढल्याने इपीटीमध्ये ९१.८२ कोटी, दरसुचीतील वाढ १९९.२६ कोटी आदींचा उल्लेख करण्यात आला आहे. पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने व वनजमिनीस मान्यता मिळण्यास विलंब झाल्यामुळे हा प्रकल्प रखडल्याचे या विभागाने म्हटले आहे. आजतागायत या प्रकल्पावर १८ कोटी इतकाच खर्च झाला असल्याने तो गुंडाळला जाण्याची शक्यता अधिक आहे.   

Story img Loader