नवी मुंबईचाच भाग असलेल्या व झपाटय़ाने विकसित होणाऱ्या उरणला जोडणाऱ्या नवी मुंबईतील बेलापूर ते उरणदरम्यानची लोकल २०१७ पर्यंत सुरू होणार असल्याचे संकेत पुन्हा एकदा सिडकोच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत. सिडको व रेल्वे यांच्या भागीदारीतून उभारल्या जाणाऱ्या या रेल्वे मार्गासाठी गव्हाण परिसरातील शेतकऱ्यांच्या तसेच वन विभागाच्या जमिनी संपादित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रस्तावित रेल्वेचे काम पूर्ण होणार आहे.
जुलै १९९७ ला मंजुरी मिळालेल्या उरण ते बेलापूरदरम्यानच्या लोकलचे काम अनेक वर्षे धिम्या गतीने सुरू आहे. २७ किलोमीटरच्या या मार्गावर एकूण दहा स्थानके आहेत. तर चार मुख्य पूल व पाच उड्डाण पूल आहेत. या मार्गावरील सिडकोच्या उलवे नोडमधील नागरीकरण पूर्ण झालेले आहे. या परिसरात नव्याने वास्तव्याला आलेल्या नागरिकांना दळणवळणाचे साधन म्हणून लोकलची गरज आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबईचा भाग असलेल्या उरण परिसरातही नागरीकरणानेही वेग धरला आहे. येथील वाढत्या औद्योगिकी व शहरीकरणामुळे वाहतूक कोडींच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दळणवळणाचे स्वस्त व सर्वात मोठे साधन म्हणजे रेल्वेची लोकल असल्याने उरण ते बेलापूरदरम्यान नवी मुंबईला जोडणारी लोकल सुरू करण्यासाठी रेल्वे मार्गाचे काम अनेक वर्षे लोटल्यानंतरही पूर्ण न झाल्याने येथील विकासातही अडथळा निर्माण झाला आहे. १७ वर्षांपासून या मार्गाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे उरण ते बेलापूरदरम्यानची लोकल लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी उरणमधील नागरिक व प्रवासी संघटनेनेही केली आहे.
या संदर्भात सिडकोच्या रेल्वे प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनील दराडे यांच्याशी संपर्क साधला असता उरण-बेलापूर रेल्वेचे उरण ते रांजणपाडा तसेच बेलापूर ते खारकोपपर्यंतचे काम सुरू आहे. यात गव्हाण विभागातील तीन किलोमीटरच्या वन जमिनीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू असून ते काम लवकरच पूर्ण होऊन २०१७ पर्यंत लोकल सुरू होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा