उरण नगरपालिकेने वर्षांला सव्वा कोटीचे कचरा उचलण्याचे वार्षिक कंत्राट दिले आहे. यामुळे कचरा वेळेत उचलण्यात येईल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत होती. मात्र ठेकेदाराच्या नियोजनाच्या त्रुटीमुळे गेल्या चार दिवसांपासून कचरा उचलण्यात न गेल्याने शहरातील कचराकुंडय़ांतील कचरा ओसंडून वाहत असल्याचे चित्र आहे. यावर कचरा उचलण्याच्या कंत्राटाची मुदत संपल्याची सारवासारव नगरपालिकेकडून करण्यात येत आहे.
अवघ्या अडीच ते तीन किलोमीटरच्या परिघात वसलेल्या उरण नगरपालिकेचे वार्षिक बजेट तीन ते साडेतीन कोटींचे आहे. जिल्ह्य़ातील सर्वात लहान असलेल्या उरण नगरपालिकेने शहरातील कचरा उचलण्याचे सव्वा कोटीचे वार्षिक कंत्राट देण्यात आलेले आहे. मात्र मागील तीन ते चार दिवसांपासून बालई कासमभाट रस्ता, आनंद नगर त्याचप्रमाणे कोटनाकासह उरण बाजारपेठेतील मध्यवर्ती ठिकाणच्या कचराकुंडय़ा ओसंडून वाहू लागल्या आहेत. या कचराकुंडय़ांवर मोकाट गुरे, कुत्री यांची झुंबड पडली असल्याने कुंडय़ांमधील कचरा रस्त्यावर पसरला आहे. याचा नाहक त्रास प्रवाशांना तसेच वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. आपल्या विभागातील कचरा उचलण्यात यावा, अशी मागणी अनेक ठिकाणांवरून नगरपालिकेकडे करण्यात आली होती. या संदर्भात नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद डवले यांच्याशी संपर्क साधला असता नगरपालिकेने ज्या कंपनीला कचरा उचलण्याचे कंत्राट दिलेले होते, त्याची मुदत संपुष्टात आल्याने नवीन कंत्राटासाठी निविदा तयार करून प्रसिद्धही करण्यात आलेली होती. मात्र निविदांना कंत्राटदारांकडून प्रतिसाद न मिळाल्याने नव्याने निविदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, उरण शहरातील कचरा उचलण्यासाठी तातडीने नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना काम सोपविण्यात आले असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा