पावसामुळे निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी उरण तालुक्यातील नियोजन व उपाययोजनांची उजळणी करीत शासकीय यंत्रणेला सज्ज करण्यात आलेले असून त्याकरिता आपत्तीत आवश्यक असलेली साधनसामुग्री यंत्रणेचा आढावा बैठकांमधून घेतला जात आहे. या बैठकांमध्ये आपत्तीच्या काळात करावयाच्या प्रतिबंध व उपाययोजनांची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात येत आहेत. त्यासाठी नागरी संरक्षण दलातील जवान सहकार्य करीत आहेत. त्यामुळे उरणमधील आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज झालेली आहे.
पाऊस लांबलेला असला तरी पावसाळ्यात येणाऱ्या आपत्तीला तोंड देण्यासाठी उरणमधील शासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी मागील आठवडाभरात तीन बैठकांचे आयोजन करण्यात आलेले आहे.या बैठकींना उरण नगरपालिकेचे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी,वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण, न्हावा-शेवा तसेच मोरा सागरी पोलीस ठाणे,सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता,महावितरणचे साहाय्यक अभियंता, साहाय्यक उपनियंत्रक नागरी संरक्षण दल, तालुका आरोग्य अधिकारी, सिडको, ओएनजीसी, खारभूमी विभाग, तालुका मंडळ अधिकारी तसेच तलाठी व ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत या बैठका घेऊन प्रत्येक शासकीय विभागांनी आपले स्वत:चे अद्ययावत नियंत्रण कक्ष तयार करावेत या कक्षातील संपर्क यंत्रणा कार्यान्वित आहे का, याची खात्री करून घ्यावी, आपल्या विभागाच्या आपत्कालीन संपर्क क्रमांकाचे फलक जनतेच्या नजरेत येतील अशा ठिकाणी प्रसिद्ध करावेत, अशा प्रकारच्या सूचना देऊन प्रत्येक विभागाचा आढावा या बैठकांत घेण्यात येत असल्याची माहिती उरणचे तहसीलदार नितीन चव्हाण यांनी दिली आहे.

Story img Loader