उरणमधील महाजनकोच्या वायू विद्युत केंद्रात कंत्राटी स्वरूपाचे साह्य़काचे काम करणाऱ्या चाळीसपेक्षा अधिक कामगारांना कंत्राटदाराने चार महिन्यांपासून वेतनच न दिल्याने कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून कंत्राटदाराच्या विरोधात कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले. कंत्राटदाराने कामगारांचे थकित वेतन, भविष्य निर्वाह निधी त्वरित द्यावा. त्याच प्रमाणे कामगारांचे मागील कंत्राटदाराने चार महिन्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या रकमा जमा कराव्यात अशी मागणी आंदोलनकर्त्यां कंत्राटी कामगारांनी वायू विद्युत केंद्राच्या प्रशासनाकडे केली आहे.
महाजनकोच्या वायू विद्युत केंद्रात श्री साई इलेक्ट्रिकल या कंत्राटदाराकडे चाळीसपेक्षा अधिक कामगार काम करीत आहेत. कंत्राटदाराने वेतन या कामगारांच्या बँकेत जमा करणे, वेतन महिन्याच्या ७ ते १० तारखांच्या आत द्यावे, कामगारांच्या अडचणींसाठी लागणारे आगाऊ वेतन देण्याची तरतूद करणे, कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेले  सेफ्टी शुज, रेनकाट देणे, दिवाळीचे बोनस तसेच दरमहा भविष्य निर्वाह निधी भरल्याचे चलन कामगारांना देणे. कामगारांना सामूहिक विमा योजना लागू करणे आदी अटी लेखी स्वरूपात कामगारांना दिल्या आहेत.
तरीही मागील चार महिन्यांत कामगारांना वेतन न देताच त्यांच्याकडून काम करून घेतले जात आहे. त्याच प्रमाणे कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीच्या रकमाही जमा करण्यात आलेल्या नाहीत. या संदर्भात महाजनकोच्या वायू विद्युत केंद्राचे मुख्य महाव्यवस्थापक मनोहर गोडवे यांच्याशी संपर्क साधला असता कंत्राटदाराला कामगारांच्या थकबाकी देण्यासाठी नोटीस बजावली असून त्याकरिता कंत्राटदाराचे उर्वरित देणी थांबविण्यात आलेली आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत कंत्राटदाराच्या उत्तराची अपेक्षा असल्याचे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा