उरण तालुक्याची ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी स्थिती आहे. तालुक्यात महाजनकोचा ६५० मेगावॅट विजेची निर्मिती करणारा देशातील पहिला वायू विद्युत प्रकल्प आहे. या प्रकल्पामधून राज्याला वीजपुरवठा केला जातो, मात्र ज्या तालुक्यात ही वीजनिर्मिती केली जाते, त्याच तालुक्यातील निम्म्या भागात दररोज सहा ते आठ तासांचे भारनियमन केले जात आहे.
तालुक्यातील हे भारनियमन गळती होत असल्याने केले जात असल्याचे कारण महावितरणकडून सांगितले जाते. याची गंभीर दखल घेत आमदार विवेक पाटील यांनी ग्रामस्थांनी भारनियमन घालविण्यासाठी गळतीचे प्रमाण कमी करण्याचे आवाहन केलेले आहे. सध्या गळतीत घट झाली आहे. तशा आशयाचा प्रस्ताव महावितरण कंपनीने वरिष्ठ कार्यालयाकडे धाडला असल्याची माहिती उरणचे साहाय्यक अभियंता उपेंद्र दोशी यांनी दिली आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात उरण तालुका भारनियमनमुक्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
उरण तालुक्यात जेएनपीटी, ओ.एन.जी.सी., घरगुती गॅस भरणा करणारा भारत पेट्रोलियमचा प्रकल्प असे अनेक उद्योग आहेत. याच उद्योग परिसरातील पाणजे, डोंगरी, फुंडे, करळ, सोनारी, जसखार, पागोटे, नवघर आणि भेंडखळ या विभागांत महावितरणच्या म्हणण्यानुसार ४२ टक्क्य़ांपेक्षा अधिक विजेची गळती होत आहे. त्यामुळे भारनियमन करावे लागत आहे. सध्या गळतीत घट झाल्याने भारनियमन कमी करण्याचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. मात्र पुन्हा गळतीचे प्रमाण वाढल्यास भारनियमम करावे लागेल, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.

Story img Loader