नवरत्न सामाजिक संस्थेतर्फे येत्या २८ डिसेंबरला प्रसिद्ध उर्दू शायर यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. या वेळी एक लाख रुपयांचा निधी देऊन त्यांना गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष अब्दुल रशीद पहेलवान व मुख्य संयोजक शेख महेमूद यांनी ही माहिती दिली.
दि. २८ ला रात्री ९ वाजता फुलंब्रीकर नाटय़गृहात आयोजित या सत्कार समारंभानिमित्ताने देशातील मान्यवर उर्दू कवींचा मुशायरा आयोजित केला आहे. मुन्नवर राणा (कोलकाता), जोहर कानपुरी व शबीना अदीब (कानपूर), नईम अख्तर (बऱ्हाणपूर), रेखा रोषनी (मुंबई), ताबेश मेहंदी (नवी दिल्ली), अबरार काशीफ (अमरावती), जफर कलीम (नागपूर), नईम फराद (अकोला), बशरनवाज आणि प्रा. अब्दूल वहाब (औरंगाबाद), महम्मद सादेक (नांदेड), अलताफ झिया (मालेगाव), काजी नसिमोद्दीन (बुलडाणा) आदी मान्यवर मुशायऱ्यात सहभागी होणार आहेत. स्थानिक उर्दू कवींचा सत्कार करण्यात येणार आहे.
शमशोद्दीन ऊर्फ शम्स जालनवी हे वयाची ८० वर्षे पार करून आजही सकाळी सायकलवरून वृत्तपत्रांचे वाटप करून चरितार्थ चालवितात. त्यांचा ‘तमतज’ हा उर्दू कवितासंग्रह प्रसिद्ध आहे. या कवितासंग्रहाचा ‘मध्यान्ह का सूर्य’ नावाने हिंदीतील अनुवाद प्रकाशित झाला आहे. राज्यासह देशभरातील अनेक ठिकाणच्या मुशायऱ्यात त्यांनी भाग घेतला आहे. त्यांच्या सत्कारानिमित्त संयोजन समितीची स्थापना केली आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. महम्मद बद्रूद्दीन असून, पालकमंत्री राजेश टोपे उपस्थित राहणार आहेत. माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार सुरेश जेथलिया, जिल्हाधिकारी श्याम देशपांडे, डॉ. संजय राख, पोलीस अधीक्षक संजय मोहिते आदींची उपस्थिती असेल.

Story img Loader