लातूर महापालिकेचे पहिले आयुक्त रुचेश जयवंशी यांची गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. गुरुवारी दुपारी तडकाफडकी हा आदेश आला.
मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागातून दुपारी ४ वाजता फॅक्सने त्यांच्या बदलीचे आदेश प्राप्त झाले. त्यांचा पदभार जिल्हाधिकारी डॉ. बिपीन शर्मा यांच्याकडे देण्याचे आदेशित केले आहे. पहिले आयुक्त जयवंशी वादग्रस्त ठरले. स्थायी समिती अकार्यक्षम आहे व दूरदृष्टीचा त्यांच्याकडे अभाव असल्याचे आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळविले होते. त्यामुळेच ते वादग्रस्त बनले. तत्पूर्वी महापौरांपासून इतर नगरसेवकांनाही वेळ घेतल्याशिवाय ते भेटत नसत. त्यामुळेही त्यांच्यावर नाराजी होती.
महापौर, नगरसेवकांबरोबरच आमदार अमित देशमुख यांच्याशीही त्यांनी वितुष्ट घेतले. परिणामी त्यांना गडचिरोली पाहावी लागली. जयवंशी यांची तडकाफडकी बदली झाल्याबद्दल काँग्रेस नगरसेवकांत आनंदाचे वातावरण पसरले. जयवंशींमुळे आयुक्त असून अडचण नसून खोळंबा, असे वातावरण महापालिकेत निर्माण झाले होते. आपल्या कार्यकाळात ते अधिक काळ कार्यालयात थांबतच नव्हते. मुंबई, नवी दिल्ली असे दौरेही त्यांनी शासकीय खर्चाने केल्यामुळे त्यांचा कारभारच वादग्रस्त बनला होता.    

Story img Loader