जैवविविधतेने संपन्न भारतात संशोधनाकरिता बरेच काही असून, भारतातीलच नव्हे तर विदेशातील संशोधकांनाही या जैवविविधतेने आकर्षिले आहे. मध्यभारतातील जीवाश्मावर संशोधनासाठी अमेरिकेतील फ्लोरिडा विद्यापीठाचे डॉ. स्टीवन मॅनचेस्टर, मिचीगन विद्यापीठाचे डॉ. सलेना स्मिथ व प्रा. नाथन सेलडोन तसेच नॉर्थ कॅरोलीना स्टेट युनिव्हर्सिटीच्या प्रा. एलिझाबेथ व्हिलर भारतात आले आहेत. या संशोधन प्रकल्पाकरिता यू.एन.एफ. अमेरिकातर्फे अर्थसहाय्य मिळाले असून प्रा. दशरथ कापगते त्यांना या संशोधनाकरिता सहाय्य करीत आहेत.
६५ ते ७० दशलक्ष वर्षांपूर्वी थेसीस समुद्रामध्ये बेटाच्या स्वरूपात असलेल्या भारतातील आताच्या दख्खनच्या पठारावरील भौगोलिक परिस्थिती, त्या काळातील हवामान व जैविक विविधता आणि त्यानंतरच्या काळात झालेला बदल याबाबतचे संशोधन केले जाणार आहे. डिसेंबरच्या पूर्वार्धातच ही चमू भारतात दाखल झाली असून भंडारा येथील जे.एम. पटेल महाविद्यालयाचे प्रा. कापगते यांच्यासोबत ते संशोधनकार्य करणार आहेत. प्रा. कापगते यांनी ३५ वर्षे मध्यभारतातील जीवाश्मावर अखंड संशोधन केले आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठातर्फे त्यांना १९९९ मध्ये डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देण्यात आली आहे.
वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख पदावरून ते सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांचे संशोधन मात्र सुरूच आहे. जीवाश्मावर त्यांनी घरीसुद्धा प्रयोगशाळा तयार केली आहे. डिसेंबरच्या पूर्वार्धात भारतात आलेल्या या चमूने सुरुवातीला गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा जंगल परिसर पिंजून काढला. सिरोंचा परिसरात त्यांना काही ठिकाणी सात कोटी वर्षांपूर्वीच्या वनस्पतीचे भरपूर अवशेष सुमारे ३५-४० फूट लांबीच्या खोडाच्या रूपात मिळाले. त्या काळातील डायनोसॉरसारख्या महाकाय प्राण्यांच्या हाडाचे जीवाश्मसुद्धा आढळले आहेत.
प्रा. कापगते यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली-रायपूर महामार्गावर सिरोंचापासून २० किलोमीटरवरील वडधम गावाजवळ भारतातील चौथे व राज्यातील पहिले जीवाश्म उद्यान साकारत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा