शिवसेना आणि छगन भुजबळ यांच्यात कोणतेही सोटेलोटे नसून चिखलीकरसह भुजबळांशी संबंधित सर्व भ्रष्टाचाराचे मुद्दे प्रचारात बाहेर काढून त्यांना पराभूत करा, असे आवाहन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. शरद पवारांच्या वक्तव्याचा संदर्भ घेऊन ठाकरे यांनी निवडणुकीत दोन वेळा मतदान करणाऱ्यांना शिवसैनिकांनी धडा शिकवावा, असेही सांगितले.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार बबन घोलप यांना न्यायालयाने सुनावलेली शिक्षा, नाशिक लोकसभा मतदारसंघात मित्रपक्ष भाजपची महापालिकेत मनसेशी असणारी युती यामुळे सेनेच्या महत्त्वपूर्ण पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी उद्धव हे सोमवारी नाशिकमध्ये दाखल झाले. पक्षप्रमुखांच्या आलिशान मोटारीचे सारथ्य सुहास कांदे करत असल्याने उपस्थितही अवाक झाले. मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता शिवसेना असा प्रवास करणाऱ्या कांदेवर अनेक गुन्हे दाखल आहेत. परंतु, तो निर्दोष असल्याचे प्रमाणपत्र देऊन शिवसेनेने त्याला आधीच पावन करून घेतले आहे. हॉटेल सूर्यामध्ये आयोजित ही बैठक अवघ्या अध्र्या तासात आटोपली. या वेळी उमेदवार हेमंत गोडसे, ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांच्यासह आ. अनिल कदम, आ. दादा भुसे व संपर्क नेते रवींद्र मिर्लेकर उपस्थित होते. बंद दाराआड झालेल्या बैठकीत ठाकरे यांनी उप जिल्हाप्रमुख, विभागप्रमुख व नगरसेवक यांना कानमंत्र देण्याचा प्रयत्न केला. नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारासमोर काँग्रेस आघाडीचे छगन भुजबळ हे उमेदवार आहेत. भुजबळ आणि शिवसेना यांच्यात काही सोटेलोटे असल्याची चर्चा होते. परंतु, त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण ठाकरे यांनी दिले. भ्रष्टाचाराशी संबंधित भुजबळांची अनेक प्रकरणे असून पदाधिकाऱ्यांनी प्रचारात त्याचा वापर करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल यांच्यावरही ठाकरे यांनी शरसंधान साधले. स्वत:ला बाहुबली समजणाऱ्यांबरोबर शिवसेनेतून कोणी गेले नाही. पक्ष एकसंध ठेवण्याची कामगिरी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी बजावली. लोकसभा निवडणुकीसाठी खुद्द करंजकरही इच्छुक होते. परंतु, आपण गोडसेंना शब्द दिल्याचे सांगितल्यावर त्यांनी स्वत: थांबण्यास संमती देऊन प्रचाराची धुरा सांभाळली. गोडसेंच्या विजयाची जबाबदारी आपल्या सर्वाची असल्याची जाणीव ठाकरे यांनी करून दिली. नाशिक जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेली पराभवाची मालिका महापालिकेपर्यंत येऊन ठेपली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीपासून विजयाची मालिका सुरू करण्याचे आवाहन त्यांनी केले. संपर्क नेते मिर्लेकर यांनी शिवसेनाप्रमुखांना अटक करणाऱ्या गद्दारांना धडा शिकविण्याचे आवाहन केले. हा धागा पकडून उद्धव यांनी शिवसेना प्रमुखांना अटकेचा प्रयत्न झाल्यावर महाराष्ट्र दहा दिवस जळत होता हे सर्वानी पाहिले असल्याचे सांगितले. बैठकीत उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या बाबतची माहिती दिली.
दोन नगरसेविकांचा सेनेत प्रवेश
या बैठकीचे औचित्य साधून माकपच्या नंदिनी जाधव आणि जनराज्य आघाडीच्या शोभा निकम यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. गेल्या काही महिन्यांपासून या नगरसेविका शिवसेनेत प्रवेश करणार याची चर्चा सुरू होती.
भाजपची लोकसभेत
मनसेशी युती नाही ना?
नाशिक महापालिकेत मनसे आणि भाजप यांची युती असल्याने आणि राज ठाकरे व नितीन गडकरी यांच्यातील मधुर संबंधामुळे अलीकडेच निर्माण झालेल्या ताण-तणावांची छाया उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावरही पडल्याचे पाहावयास मिळाले. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीदरम्यान भाजप व रिपाइंच्या शिष्ट मंडळाने त्यांची भेट घेऊन प्रचार नियोजनाबद्दल चर्चा केली. या वेळी भाजपच्या शिष्ट मंडळाला उद्धव यांनी लोकसभा निवडणुकीत महापालिकेसारखी तुमची मनसेशी युती नाही ना, असा प्रश्न केला. या प्रश्नाने चपापलेल्या भाजप शिष्ट मंडळाने मनसेशी युती केवळ महापालिकेपुरतीच मर्यादित असून लोकसभेसाठी शिवसेनेसोबत युती असल्याचे नमूद केले. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, भाजपने अलीकडेच बुथप्रमुखांचा मेळावा घेतला. तसेच पुढील काळात मंडलनिहाय सेना-भाजपच्या संयुक्त बैठका घेतल्या जाणार असल्याचे शिष्ट मंडळाने नमूद केले. या शिष्टमंडळात प्रदेश चिटणीस सीमा हिरे, शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, उपमहापौर सतीश कुलकर्णी, महेश हिरे आदींचा समावेश होता. उद्धव यांनी भाजपच्या शिष्टमंडळासमोर थेट उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे भाजपच्या भूमिकेविषयी अद्यापही त्यांच्या मनात संभ्रम असल्याचे अधोरेखित झाले.
भुजबळांच्या विरोधातील सर्व मुद्दे प्रचारात वापरा
शिवसेना आणि छगन भुजबळ यांच्यात कोणतेही सोटेलोटे नसून चिखलीकरसह भुजबळांशी संबंधित सर्व भ्रष्टाचाराचे मुद्दे प्रचारात बाहेर काढून त्यांना पराभूत करा
First published on: 25-03-2014 at 07:59 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Use all bhujbal against isseues in convention uddhav thackeray