*  महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा पदवीदान समारंभ
*  सर्वाधिक सुवर्ण पदके मुंबईच्या नावावर
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातून पदवीप्राप्त करणाऱ्यांनी  विद्यापीठातून मिळविलेल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग शेतकरी व समाजाच्या सर्वागीण प्रगतीसाठी करावा, असे आवाहन नवी दिल्ली येथील कृषी वैज्ञानिक मंडळाचे सभापती डॉ. गुरबचन सिंग यांनी केले.
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा सहावा पदवीदान समारभ डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला होता, याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ए. के. मिश्रा होते. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. संपत खिलारी, मत्स्य विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. दळवी, दुग्ध तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. कडू, पशुवैद्यक विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. कनेरे प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ. सिंग म्हणाले, भारताच्या लोकसंख्येच्या ६५ टक्के ग्रामस्थांचा पशुपालन हा उदरनिर्वाहाचा व्यवसाय आहे. पशुपालन, मत्स्यपालन, दुग्धव्यवसायामुळे ग्रामीण भागातील जनतेला रोजगार उपलब्ध झाला असून त्यांच्या उत्पन्नात भर पडली आहे. दुष्काळ आणि नैसर्गिक संकटामध्ये पशुपालन हे क्षेत्र विम्याचे काम करते. परंतु आता नवीन पिढी शेती व त्यावर आधारित उद्योगाकडे वळत नाही. भारतातील पशुधन हे जगातील सर्वात मोठे पशुधन म्हणून ओळखले जाते. जगातील म्हशींपैकी ५६ टक्के म्हशी, १३ टक्के गायी भारतात आहेत. १९५१ मध्ये दूध उत्पादन १७ दशलक्ष मेट्रिक टन होते ते २०१२-१३ मध्ये वाढून १३८ दशलक्ष मेट्रिक टन झाले आहे. उत्पादन वाढीसाठी पशुधनाची संख्या तसेच शेतकऱ्यांच्या दारात राबवलेल्या नावीण्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे हे सगळे शक्य झाल्याचेही ते म्हणाले.
आयएएमआर २०१० च्या अहवालानुसार भारताला एकूण ९६ हजार पशुवैद्यकांची गरज आहे. सध्या ४३ हजार पशुवैद्यक कार्यरत आहेत. तसेच ६ हजार ५०० पशुविज्ञान शास्त्रातील तज्ज्ञांची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे मानवी संसाधन गरजा भागविण्यासाठी विद्यापीठाने या क्षेत्रात वेगाने काम करण्याची गरज असल्याचेही डॉ. सिंग यांनी स्पष्ट केले. तरुण पदवीधारकांनी जास्तीत जास्त संख्येने लोकसेवा आयोगाच्या समकक्ष असलेल्या एआरएस परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
तत्पूर्वी, कुलगुरू प्रा. ए.के. मिश्रा यांनी सन २०११-१२ व २०१२-१३ या वर्षांच्या पदवीदान समारंभाची माहिती दिली. या समारंभात एकूण ७८५ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात याल्या. यापैकी ६३८ पदव्या पशुवैद्यकीय विद्या शाखा, ८४ पदव्या दुग्ध तंत्रज्ञान विद्या शाखा, व ६३ पदव्या मत्स्य विज्ञान विद्या शाखेतील विद्यार्थ्यांना तसेच पशुवैद्यकीय विज्ञान शाखेतील ३१९ स्नातक, ३०१ स्नातकोत्तर व १८ आचार्य पदव्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या. पदव्या प्रदान करण्यात आलेल्यांमध्ये मुलींची संख्या ३० टक्के एवढी आहे. प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेल्या तिन्ही विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना एकूण ३२ पदके प्रदान करण्यात आली. यामध्ये २४ सुवर्ण व ८ रौप्यपदकांचा समावेश आहे.
२०११-१२ या शैक्षणिक सत्रात पदवी अभ्यासक्रमासाठी एकूण १४ सुवर्ण पदकांपैकी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील नमिता नितीन नाडकर्णी हिने ६ सुवर्ण पदके प्राप्त केली. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी असलेल्या एकूण ५ सुवर्ण पदकांपैकी ३ सुवर्णपदके राजलक्ष्मी बेहरा, प्रियंका भिवगडे आणि उर्वशी वर्मा यांनी पटकावली. शैक्षणिक सत्र २०१२-१३ मधील पदवी अभ्यासक्रमासाठी असलेल्या एकूण १४ सुवर्ण पदकांपैकी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील आकाश प्रदीप वेदपाठक याने ७ सुवर्णपदक पटकावून मुंबईचे नाव रोशन केले. मत्स्य विज्ञान शाखेतील एकमेव सुवर्ण पदकाचा मानकरी उदगीर येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयातील गोपाल डोंगरे याने मिळवला. दुग्धतंत्रज्ञान विद्याशाखेतील पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठी वरुड (पुसद) येथील दुग्धतंत्रज्ञान महाविद्यालयातील परमेश्वर सारंगधर जोटलकर याने ३ सुवर्ण पदक पटकावले. या कार्यक्रमास विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य, विविध महाविद्यालयातील विविध विभागाचे अधिष्ठाता, संचालक, प्राध्यापक प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. शिरीष उपाध्ये यांनी संचालन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा