भारतीय लष्करात कालबाह्य़ विमाने, हेलिकॉप्टर आणि शस्त्रास्त्रांचा वापर कायम वादग्रस्त मुद्दा ठरला असून, तिसरी महाशक्ती म्हणवणाऱ्या देशात कालबाह्य़ विमान किंवा हेलिकॉप्टर्सचे होत असलेले अपघात ही लाजिरवाणी बाब ठरत आहे.
देशात आता कुठे ६०-७० च्या दशकातील विमाने मोडीत काढली जात आहेत. एका बाजूला चीन आणि दुसऱ्या बाजूला पारंपरिक शस्त्रू पाकिस्तान असताना सुसज्ज आणि अत्याधुनिक लष्कर अपेक्षित आहे. परंतु गेल्या काही वर्षांत हेलिकॉप्टर आणि युद्ध विमानांच्या अपघातांमुळे प्रशिक्षण पातळीवरच मोठी जीवतहानी झाली आहे. प्रत्यक्ष युद्धात शहीद न होतात अपघातात मृत्यू पडलेल्या जवानांच्या कुटुंबांना दुखात लोटणारा हा सारा प्रकार आहे. कालबाह्य़ विमाने, हेलिकॉप्टर तसेच जुन्या बंदुकांचा वापर भारतासाठी जुनाच विषय आहे. यासंदर्भात विविध पातळ्यावर चर्चादेखील झाली आहे. परंतु संरक्षण खात्यासाठीची तरतूद कमी असणे हा मुद्दा पुढे केल्या जात असतो. देशातील राजकारण बघता विदेशातून संरक्षण साहित्य खरेदी कायम घोळ घातला जात असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे खरेदी प्रक्रिया अनेक महिने मार्गी लागत नाही.
दुसरीकडे बलाढय़ देशाला स्वदेशी बनावटीचे लक्ष्य पूर्ण करता आले नाही. यामुळे परदेशी विमाने, हेलिकॉप्टर आणि शस्त्र सामुग्रीवर अवलंबून राहावे लागत आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर भारतीय लष्कराला जुने साहित्य अद्यावत करून वापरावे लागते. अशा विमाने, हेलिकॉप्टरच्या उड्डानामुळे अनेकदा अपघात झाले आहे. लष्कारातील वाढत्या अपघातामुळे चिंताग्रस्त सैन्यदलातील अधिकाऱ्यांच्या पत्नीच्या एका गटाने मुदत संपलेल्या चित्ता, चेतक हेलिकॉप्टरचा वापर बंद करण्याची विनंती गेल्या आठवडय़ात संरक्षण मंत्री मनोहर र्पीकर यांना केली. सैन्यदलाच्या हवाई वाहतूक ताफ्यात चित्ता, चेतकला तैनात करण्यास त्यांनी विरोध केला आहे.
लष्काराने २०११-१२ पासून झालेल्या अपघातात २८ विमाने आणि १४ हेलिकॉप्टर्स गमावले आहेत. या अपघातात ४२ जणांचा बळी गेला. अपघातग्रस्त २८ विमानांमध्ये मुदत संपलेली मिग विमानांची संख्या अधिक होती. या विमानांना केव्हाच सेवामुक्त करणे आवश्यक होते. मिग सारखीच अवस्था चित्ता, चेतकची झाली आहे. अपघातीची श्रृखला बघता मिग जेटला तर ‘उडती शवपेटी’ म्हटले जाते. भारत आतापर्यंत रशियन बनावटीच्या युद्धविमानांवर विश्वास ठेवत आला आहे. यामुळे भारतीय लष्कराकडील बहुतांश युद्धविमाने आणि इतर साहित्य रशियन आहेत. परंतु अलीकडे भारताने अमेरिका आणि अन्य देशांकडूनदेखील खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.

भरीव तरतूद हवी – देव
सरकारने हेलिकॉप्टर नव्हे तर शस्त्रास्त्रे आणि इतर साहित्य अद्ययावत करण्यास, खरेदी करण्यास अर्थसंकल्पात भरीव तरतूद करायला हवी. जगात तिसरी महाशक्ती असलेल्या भारताला अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेच पाहिजे, याचा विचार होणे गरजेचे आहे. कालबाह्य़ शस्त्रे वापरून चालणार नाही, असे युद्धविधवा असोसिएशनच्या अध्यक्षा अनुराधा देव म्हणाल्या.