पर्यावरण आणि मानव-पशूंच्या आरोग्यास हानीकारक ठरलेल्या प्लास्टिकचा वापर धडाक्यात व खुलेआमपणे सुरू असून त्याचे ना प्रशासनाला सोयरेसुतक ना नागरिकांना. अधूनमधून प्लास्टिक पिशव्या जप्तीची मोहीम घेतली जाते नि तेवढय़ाच आकस्मिकपणे ती थांबवलीदेखील जाते.
भाजीवाला, फळवाला, किराणा दुकान, खाद्य वस्तू विक्री दुकान, औषधे आदी सर्वच ठिकाणी पातळ व कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर सर्रास सुरू आहे. याच प्लास्टिकच्या पिशव्यांमधून टाकाऊ अन्न वा वस्तू लोक फेकून देतात. महाराजबाग, अंबाझरी, फुटाळा तलाव, सोनेगाव तलाव, बालोद्यान या ठिकाणी तर लोकांच्या निष्काळजीपणाचा कहर झाला आहे. उद्यानात येणारे प्लास्टिकच्या पिशव्या सोडून निघून जातात. विविध ठिकाणी त्यासाठी कचरा कुंडी असते, मात्र त्याचा उपयोग नागरिक करीत नसून रस्त्यावर या पिशव्या फेकून देतात. त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर तसेच पाळीव प्राणी, वन्यजीवांचे अतोनात नुकसान होते. पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साठू लागले की, आपण शासन व प्रशासनावर टीका करतो. पण सामान्य नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडण्यात आपण दुर्लक्ष करीत असतो.
इतरत्र फेकलेल्या प्लास्टिक पिशव्या गायवगैरे प्राणी त्या खातात. प्लास्टिकमधील वस्तू नष्ट होतील पण प्लास्टिक नष्ट होत नाही. त्यामुळे हेच प्लास्टिक प्राण्यांच्या पोटात अडकून राहते. त्यामुळे प्राण्यांचे जीवन धोक्यात येते. अनेकजदा घशात अथवा श्वास नलिकेत अडकून प्राण्याचा मृत्यूही होऊ शकतो. जमिनीत अथवा पाण्यात असले तरी प्लास्टिक नष्ट होत नाही. प्लास्टिक जाळले तर हवेत प्रदूषण होते. प्लास्टिकमध्ये विविध घातक रसायने असतात. मानवाच्या कातडीला ते धोकादायक ठरू शकते. जमीन तसेच पाण्यातही ते हानीकारक ठरते. पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अन्वये शासनाने ४० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर (वापर आणि विक्री) बंदी घातली आहे. हे माहिती असूनही त्यापेक्षा कमी जाडीच्या पातळ प्लास्टिकच्या पिशव्यांची निर्मिती व विक्री धडाक्यात सुरू आहे. केवळ नागपूरच नव्हे तर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हेच सुरू आहे. संबंधित प्रशासन प्लास्टिक पिशव्या जप्तीची मोहीम अधूनमधून हाती घेत असते. गेल्यावर्षी जानेवारी ते जून या पहिल्या सहा महिन्यात महापालिकेच्या पथकाने शहरातील विविध भागात कारवाई करून ६५६ किलो, २५० ग्राम प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आणि ४७ हजार ५०० रुपये दंड वसूल करून काही दुकानदारांना नोटीस दिली होती. काही दिवस ही मोहीम धडाक्यात सुरू असते. अचानक ती थांबते. थातूरमातूर कारवाई होत असल्याने कुणीच ही बाब गंभीरतेने घेत नाही. प्लास्टिकच्या पिशव्यांचा अनावश्यक वापर करून मानवी आरोग्याशी खेळले जात आहे.
‘प्लास्टिकची पिशवी मागू नका’ अशी पाटी लिहिलेल्या दुकानातही दुकानदार पिशव्या ठेवतात. ज्या ग्राहकांकडे पिशव्या नसतात त्यांना आम्ही देतो. नाहीतर ते माल घेतच नाहीत. आमचाही नाईलाज आहे, असे दुकानदारांचे म्हणणे असते. घरून निघताना कापडी पिशवी घ्यायला विसरलो हे कारण ग्राहक सांगतो. असे असले तरी काही दुकानदार मात्र प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण आणण्याचा मनापासून प्रयत्न करीत आहेत. अनेक दुकानांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या ग्राहकांना दिल्याच जात नाही. अनेक दुकानदार ग्राहकाने प्लास्टिकची पिशवी मागितली तर अतिरिक्त पैसे घेतात. अनेक ग्राहक प्लास्टिकचा अनावश्यक वापर करीत नाहीत. मात्र, असे ग्राहक आणि दुकानदारांची संख्याच अत्यल्प आहे. अनेक ग्राहक वा दुकानदार प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रास करतात. प्लास्टिकचा वापर न करण्याची सुरुवात प्रत्येकाने स्वत:पासून सुरू करायला हवी. घराबाहेर पडताना पिशवी घेऊनच बाहेर पडा. प्लास्टिकची पिशवी मागू नका. तरच प्लास्टिकचा वापर कमी होऊ शकेल.

Story img Loader