प्रसंग पहिला
स्थळ : जुन्या फर्निचरचे बाजार. (या ठिकाणी आपण आपली जुनी वस्तू विकायची म्हणून विक्रेता होऊन गेल्यावर)
विक्रेता : आमच्या घरातील जुने कपाट विकायचे आहे.
दुकानदार : केवढे आहे.
विक्रेता : छोटे आहे.
दुकानदार : फोटो आहे का?
विक्रेता : नाही.
दुकानदार : माझा नंबर घ्या. फोटो व्हॉट्सअ‍ॅप करा. आवडला तर येतो घ्यायला.

प्रसंग दुसरा
भर बाजारातील एका किरणा मालाच्या दुकानावरील फलक. आमच्या येथे व्हॉट्सअ‍ॅपवरून किरणा मालाची यादी स्वीकारली जाईल. खाली एक व्हॉट्सअ‍ॅपचा क्रमांक.

ग्राहकांना सुविधा देण्यासाठी छोटय़ा उद्योगांपासून ते मोठय़ा उद्योगांपर्यंत प्रत्येकजण काही ना काही शक्कल लढवत असतो. यामुळे ग्राहकांच्या सुविधेबरोबरच व्यवसायवृद्धीचा स्मार्ट पर्याय म्हणून सध्या स्थानिक पातळीवर मोठय़ा प्रमाणात व्हॉट्सअ‍ॅपचे ‘उद्योग’ सुरू झाल्याचे दिसते आहे. व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करून अनेक जण आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत तर अनेकजण याचा वापर करून आपला वेळ वाचवितात. वरील दोन उदाहरणांवरून छोटे उद्योग कशा प्रकारे व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात हे समजून येते. व्हॉट्सअ‍ॅप हे वापरण्यासाठी येणारा खर्च हा अगदीच नगण्य असतो. पण त्यामुळे खूप वेळ आणि अनावश्यक मेहनत वाचते असे या दुकानदारांचे म्हणणे आहे.
छोटय़ा उद्योगांबरोबरच अनेक दुकानदारही आपल्या ग्राहकांना अपडेट करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. यापूर्वी अनेक दुकानदार आपल्या नियमित ग्राहकांना लघुसंदेशाचा वापर करून दुकानात येणाऱ्या नवीन गोष्टींची माहिती पुरवीत असत. पण यामध्ये अनेक मर्यादा येत होत्या. पण आता या दुकानदारांनी व्हॉट्सअ‍ॅपचे ग्रुप तयार केले असून त्या ग्रुपवर दुकानात आलेल्या नव्या गोष्टींची माहिती पुरविली जाते. जेणेकरून ग्राहक अपडेट होतात आणि ते दुकानात पोहोचतात. व्हॉट्सअ‍ॅपमुळे विक्रीमध्ये २० टक्के वाढ झाल्याचे मुंबईतील एका ब्रँडेड कपडय़ांच्या दुकानातील व्यवस्थापकाने सांगितले. यापूर्वी लघुसंदेश पाठविला जायचा. मात्र व्हॉट्सअ‍ॅपमुळे अता ग्राहकांना केवळ माहिती नव्हे तर फोटोही पाठविणे शक्य होते. फोटोमुळे त्यांना नवीन उत्पादनाची साधारण कल्पना येते आणि त्यानंतर ते ज्या वेळेस दुकानात येतात तेव्हा जास्त विचार न करता पटकन निवड करता येणे सोपे होते असेही त्या व्यवस्थापकाने सांगितले.