ब्रह्मपुत्रेला अनेकदा येणारे महापूर आणि त्यानंतर बेटाचे उद्ध्वस्त आणि उजाड होणे हे खरेतर त्याच्यासाठी तसे नेहमीचेच होते.. मात्र ‘या पुराच्या पाण्यातून येणाऱ्या गाळाच्या सुपीक मातीच्या माध्यमातून एक चांगले जंगल उभे राहू शकते’ हे वडिलांचे विधान त्याला सतत आठवयाचे.. अखेरीस ते सत्यात उतरवण्याचा त्याने केलेला प्रयत्न म्हणजे एका अजोड जिद्दीची कहाणीच आहे. ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातील त्या उजाड बेटावर एक घनदाट जंगल उभे राहिले असून आता हत्तींपासून ते इतर वन्य जीवांपर्यंत अनेकांनी ते जंगल हे आपले कायम वास्तव्याचे ठिकाण म्हणून स्वीकारले आहे.. जाडाव पेयांग यांच्यातील या असामान्य जिद्दीला यंदा सँक्च्युरी एशियाने सलाम केला आहे.
यंदाच्या सँक्च्युरी एशिया वन्यजीव पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. त्यावेळेस जाडाव पेयांग स्वत उपस्थित होते. वडिलांनी सांगितलेले ते स्वप्न सत्यात येऊ शकते, असे आपल्याला सातत्याने वाटत होते आणि म्हणून आपण त्या दिशेने प्रयत्न केले इतकेच, या मोजक्याच शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पेयांग यांच्याच सोबत पेंच अभयारण्यातील फिल्ड डिरेक्टर श्रीनिवास रेड्डी, गोव्याचे अतिरिक्त पीसीसीएफ रिचर्ड डिसूजा, वायनाड प्रकृती संरक्षण समितीचे एन. बदुशा, वायनाडचे विभागीय वनाधिकारी पी. धनेश कुमार आदींनाही या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. याच याचबरोबर आणखी दोन प्रकारच्या पुरस्कारांची घोषणाही करण्यात आली यात तीन मराठी चेहऱ्यांचा समावेश आहे. उमरेड अभयारण्यात कार्यरत असलेल्या रोहीत कारू याला यंग नॅच्युरॅलिस्ट पुरस्कार, आयबीएन लोकमतच्या डेप्युटी फीचर एडिटर आरती कुलकर्णी यांना विंड अंडर द विंग्ज पुरस्कार तर प्रा. चंद्रकांत वाकणकर यांना ग्रीन टीचर्स पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झालेल्या तरुणांमध्ये सारा तेजपाल आणि रोहन चक्रवर्ती यांचाही समावेश आहे.  आपले संपूर्ण आयुष्य वाघाच्या संवर्धनासंदर्भात वेचणाऱ्या बेलिंडा राईट यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. भारतातील वाघांच्या शिकारीनंतर ती कातडी तिबेट आणि चीनपर्यंत कशी पोहोचते त्याचा माग काढून ते जगासमोर आणण्याचे श्रेय बेलिंडा राईट यांना जाते. उद्या एनसीपीएच्या टाटा सभागृहात समारंभपूर्वक या पुरस्कारांचे वितरण होईल.     

वाघांसाठीचे सर्वोत्तम राज्य  महाराष्ट्र ?
वाघांच्या संवर्धनासाठीचे सर्वोत्तम राज्य म्हणून महाराष्ट्राची निवड करण्यात आल्याची घोषणा सँक्च्युरी संपादक बिट्ट ू सहेगल यांनी केली. राज्याचे वन सचिव प्रवीण परदेशी त्यावेळेस उपस्थित होते. परदेशी यांच्या कामामुळेच महाराष्ट्राला हा मान मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यावेळेस अलीकडच्या काळात अनेक वाघांच्या मृत्यूच्या घटना घडल्यानंतरही हा पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर झाला, यावरून उपस्थितांमध्ये अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या!

Story img Loader