शहरासाठी उताराने पाणीपुरवठा करण्यासंदर्भात सव्‍‌र्हेक्षण करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी दिले होते. परंतु महिना होऊनही संबंधित विभागाने त्याची कोणतीही दखल घेतलेली नाही. पालकमंत्र्यांनी तरी याप्रकरणी लक्ष द्यावे, अशी मागणी शहर शिवसेनेतर्फे पालकमंत्री छगन भुजबळ आणि आ. पंकज भुजबळ यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
नांदगाव येथील माणिकपुंज धरण लोकार्पण व पाणीपूजन कार्यक्रमानिमित्त आलेले जलसंपदा मंत्री तटकरे यांनी मनमाड शहरासाठी उताराने पाणीपुरवठा करण्यासंदर्भात तातडीने सव्‍‌र्हेक्षण करण्यास संबंधितांना बजावले होते. त्याची कोणतीही दखल अद्याप घेण्यात आलेली नाही. त्यामुळे पूरक पाणीपुरवठा योजनेमुळे पालिकेवर वीज देयकांचा आर्थिक बोजा वाढून पालिका डबघाईला येत असून शहराच्या विकास कामांना खीळ बसत आहे.
पालिकांसाठी असलेल्या विविध उपक्रमांना लोकवर्गणीसाठी उभारावी लागणारी रक्कम भरता येणे शक्य होत नाही. बिकट आर्थिक परिस्थितीमुळेच पाणी पुरवठा, आरोग्य इत्यादी समस्यांमधून बाहेर पडणे पालिकेला कठीण जात आहे. अशा परिस्थितीमध्ये उताराने पाणीपुरवठा योजना यशस्वी झाल्यास वीज देयक, जलवाहिनी दुरुस्ती यावरील खर्चाची बचत होऊन इतर विकास कामांना पैसा वापरला जाईल, असे निवेदनात शिवसेना शहरप्रमुख संतोष बळीद यांनी नमूद केले आहे.
शहरवासीयांना १८ ते २० दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने मनमाडकर वैतागले आहेत.
पाटोदा येथील पंिपग स्टेशन येथे अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने पालखेड कालव्याचे उपलब्ध झालेले पाणी वाघदर्डी येथील धरणात आणणे शक्य होत नाही. त्यामुळे शहराला कित्येक वर्षांपासून टंचाईला तोंड द्यावे लागत असून त्यात महावितरणच्या अनागोंदी कारभाराची भर पडत आहे. पंपिंग स्टेशन येथे पूर्ण दाबाने वीजपुरवठा केल्यास शहराची टंचाई कमी होऊ शकते असेही बळीद यांनी निवेदनात नमूद केले आहे.

Story img Loader