जिल्हा तालिम संघ व महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वतीने अकरावी ‘उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती’ दि. येत्या दि. २३ व २४ ला नगर शहरातील वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलात होणार आहेत. विजेत्यास अडीच लाख रुपये व चांदीची गदा दिली जाणार आहे. याचवेळी छबुराव पैलवान लांडगे प्रतिष्ठानच्या वतीने जंगी निकाली कुस्तीचे मैदानही भरवले जाणार आहे. स्पर्धा मॅटवर तर मैदान मातीत होईल.
स्पर्धेचे स्वागताध्यक्ष दादा कळमकर व संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव लांडगे यांनी ही माहिती दिली. पदाधिकारी आप्पा खताडे, अॅड. लक्ष्मण वाडेकर, राजेंद्र चोपडा, अशोक बाबर, एल. बी. म्हस्के, नाना डोंगरे आदी उपस्थित होते. आज सकाळी जुन्या जमान्यातील नामवंत पहेलवान शतायुषी सदाप्पा निस्ताने (वय १०७) यांच्या हस्ते पूजन करुन मैदान उभारणीच्या कामास सुरुवात करण्यात आली.
स्पर्धेत उत्तर महाराष्ट्राच्या ५ जिल्ह्य़ातील, ४५, ५५, ६०, ६६, ७४, ८४, व १२० किलो वजनगटातील सुमारे २५० मल्ल सहभागी होतील. यंदाच्या स्पर्धेत ९६ किलो वजन गट रद्द करुन ४५ व ५५ हे दोन गट घेण्यात आले आहेत. किताब विजेत्यास चोपडा यांचे दिवंगत वडिल बाबुशेठ चोपडा यांच्या स्मरणार्थ एक किलो चांदीची गदा दिली जाणार आहे. स्पर्धा दि. २३ रोजी होतील. उद्घाटन पालकमंत्री बबनराव पाचपुते, आ. शिवाजी कर्डिले, आ. अरुण जगताप, आ. राम शिंदे, क्रीडा उपसंचालक आनंद व्यंकेश्वर आदींच्या उपस्थितीत होईल.
दुसऱ्या दिवशी दि. २४ रोजी प्रतिष्ठानच्या वतीने हिंद केसरी युद्धवीर राणा विरुद्ध बाला रफिक शेख (करमाळा), महेश वरुटे (कोल्हापूर) विरुद्ध विकास जाधव (पुणे), सागर बिराजदार विरुद्ध अमोल लंके, वसरदार सावंत विरुद्ध गोकुळ आवारे यांच्या लढतीचे जंगी मैदान होणार आहे. त्यासाठी २ लाख ५१ हजार रु. व १ लाख रुपयांचे रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. यावेळी मनिषा दिवेकर विरुद्ध राजश्री कांबळे, प्रियंका आल्हाट विरुद्ध राजश्री माने यांच्यात प्रदर्शनीय लढती होतील.
दुष्काळग्रस्तांना मदत
कुस्ती स्पर्धेचे औचित्य साधून जिल्हा तालिम संघ दुष्काळग्रस्त बाराबाभळी व शहापूर (ता. नगर) या दोन गावांना दि. ३ मेपर्यंत दररोज टँकरने १० हजार लिटर पाणी पुरवठा करणार आहे. तसेच प्रत्येक आठवडय़ास १० टन चारा पुरवला जाणार आहे. दोन्ही गावांत मिळून ७०० जनावरे आहेत, असे कळमकर व लांडगे यांनी सांगितले.
मॅट अद्यापि संकुलातच
जिल्हा क्रीडा कार्यालयाने जिल्हा तालिम संघास कुस्तीची मॅट दिली आहे. परंतु ती अद्याप संघाच्या ताब्यात दिलेली नाही. ती संकुलातच पडून आहे. संघास मॅट दिली तरी ती कोठे ठेवणार व सरावासाठी उपलब्ध होणार का हा प्रश्न आहे. स्व. खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेच्या वेळी कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी जिल्हा संघाने एक वर्षांत प्रशिक्षण केंद्र सुरु न केल्यास संघ बरखास्त करण्याचा इशारा दिला होता तर पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी कुस्ती व खो-खो साठी प्रत्येक तालुक्यास मॅट देण्याची घोषणा केली होती, या दोन्ही पातळ्यांवर अद्याप काही हालचाली नाहीत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा