नगरमध्ये उद्यापासून (शनिवार) सुरु होत असलेल्या अकराव्या उत्तर महराष्ट्र केसरी स्पर्धेत पाच जिल्ह्य़ातील सुमारे २५० वर पहेलवान सहभागी होत आहेत. काही जिल्ह्य़ांचे संघ आज रात्री दाखल झाले तर काही उद्या सकाळी दाखल होतील. मॅटवर होणाऱ्या स्पर्धेतील कुस्त्यांबरोबरच मातीच्या कुस्त्यांचे मैदानही आयोजित करण्यात आले आहे.
जिल्हा तालिम संघ व राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धेसाठी वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलात दोन्ही प्रकारचे आखाडे तयार करण्यात आले आहेत. लढतीची तयारी पूर्ण झाल्याची व उद्या सकाळी साडेआठ वाजल्यापासून वजने घेण्यास सुरुवात केली जाणार आहे. संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव लांडगे यांनी ही माहिती दिली.
स्पर्धेतील कुस्त्या ४५, ५०, ५५, ६०, ६५, ७४, ८४ व १२० किलो वजन गटात खेळवल्या जातील. यंदा ९६ किलो वजन गट रद्द करुन ४५ व ५५ किलोचा गट सहभागी करण्यात आला आहे. स्पर्धेचे उद्घाटन सायंकाळी ६ वाजता पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत होईल. नगरसह नाशिक शहर व जिल्हा, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्य़ातील मल्ल सहभागी होतील.
रविवारी (दि. २४) छबुराव लांडगे प्रतिष्ठानच्या वतीने मातीवरील कुस्तीचे मैदान भरवले जाणार आहे. त्यात हिंदकेसरी युद्धवीर राणा (सोनपत) विरुद्ध महाराष्ट्र केसरी बाळा रफिक शेख (करमाळा), महेश वरुटे (कोल्हापुर) विरुद्ध विकास जाधव (पुणे), सागर बिराजदार विरुद्ध अमोल लंके, सरदार सावंत विरुद्ध गोकुळ आवारे या नामवंतांच्या लढती होतील. त्यासाठी २ लाख ५१ हजार रु., चांदीची गदा, १ लाख रु. तशीच इतर रोख स्वरुपाची बक्षिसे आहेत. याशिवाय महिला मल्लांचे प्रदर्शनीय सामने होतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा