नांदगाव तालुक्यातील उत्तराखंडात गेलेले सर्व यात्रेकरू सुखरुप असून ते परतीच्या मार्गावर असल्याची माहिती शासकीय यंत्रणेकडून देण्यात आली आहे. विविध यात्रा कंपन्यांबरोबर खासगीरित्या चारधाम यात्रेस गेलेले नाशिक जिल्ह्यातील यात्रेकरू रेल्वेने परतू लागल्याने येथील स्थानकातील गर्दी वाढली आहे.
मनमाड येथे थांबणाऱ्या सचखंड व अमृतसर, झेलम या दिल्लीहून येणाऱ्या रेल्वे गाडय़ांतून सुखरुपपणे परतलेल्या भाविकांना घेण्यासाठी त्यांचे कुटुंबिय, नातेवाईक व मित्र परिवार रेल्वे स्थानकावर गर्दी करीत आहेत. रविवारी २१ भाविक सचखंड एक्स्प्रेसने उतरले तेव्हा नातेवाईक व मित्रांनी एकच आनंदोत्सव साजरा केला. नांदगाव तालुक्याच्या भवरी येथील आनंदा गायकवाड, कुसूम गायकवाड, लक्ष्मीबाई गायकवाड, मधुकर गायकवाड यांचा पाच दिवसांपासून संपर्क तुटला होता. अखेर बद्रीनाथजवळील सतक्षेत्र मठात ते सुखरूप असल्याची माहिती मिळाली. केदारनाथचे दर्शन झाल्यावर बद्रिनाथच्या वाटेवर असलेल्या या चौघांचा पाच दिवसांपासून संपर्क तुटला होता. गोविंद घाटातून जोशी मठापर्यंत पोचल्यानंतर त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नव्हता. मंगळवारी सकाळी त्यांच्याशी पुन्हा संपर्क झाला. शनिवारी हेलिकॉप्टपर्यंत पोचूनही त्यांचा नंबर न लागल्याने रात्रभर त्यांना ताटकळत रहावे लागले.

Story img Loader